'जरंडेश्वर ED च्या ताब्यात असताना कारखान्याला खोडसाळपणाची नोटीस'

Shalinitai Patil
Shalinitai Patilesakal
Updated on
Summary

'सध्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना ईडीच्या ताब्यात आहे.'

कोरेगाव : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) अवसायनात निघाला असून, त्यावर अवसायक म्हणून कोरेगावच्या सहायक उपनिबंधकांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, कारखान्याच्या वतीने मुंबई येथील डीआरएटी कोर्टात कारखान्याचा विक्री व्यवहार रद्द करण्यासंदर्भातील दावा सुरू असताना व ही न्यायप्रविष्ट बाब असताना तसेच सध्या हा कारखाना इडीच्या ताब्यात असताना कारखाना अवसायनात निघाल्याची प्रसिद्ध झालेली नोटीस बेकायदेशीर, खोडसाळपणाची व सभासद शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करणारी आहे. नजीकच्या काळात योग्य तो निर्णय होऊन हा कारखाना सभासदांना मिळणार असल्याची कल्पना संबंधितांना असल्यामुळे सत्तेचा व शासकीय अधिकाऱ्याचा गैरवापर करून हे सर्व प्रकार सुरू आहेत. ते कोणीही गांभीर्याने घेऊ नयेत, असे आवाहन ‘जरंडेश्वर’च्या संस्थापिका, अध्यक्षा शालिनीताई पाटील (Shalinitai Patil) यांनी पत्रकाद्वारे सभासद शेतकऱ्यांना केले आहे.

यासंदर्भातील पत्रकात श्रीमती पाटील यांनी म्हटले आहे, की जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यास दहा जून २०२० रोजी पुणे येथील प्रादेशिक साखर सहसंचालकांनी नोटीस दिली होती. त्यास उत्तर देऊन कारखान्याच्या वतीने सुरू असलेल्या कामकाजाची सर्व माहिती पत्रामध्ये नमूद केली होती व कारवाई रद्द करावी, असे कळवले होते. त्यावर प्रादेशिक सहसंचालकांनी ‘कोर्टात दाद मागावी,’ असे कारखान्यास लेखी कळवले आहे. त्यानुसार कारखान्याच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दावा (क्रमांक ९२४५०/२०२०) दाखल केला असून, प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशाला स्थगिती मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यावर चार फेब्रुवारी २०२२ रोजी युक्तिवाद झाला असून, पुढील युक्तिवाद चार मार्च २०२२ रोजी ठेवला आहे. अशाप्रकारे कायदेशीर कारवाई सुरू असून, याप्रकरणी अंतिम निर्णय येणे असताना व ही न्यायप्रविष्ट बाब असताना आज (ता. १८) कोरेगाव येथील सहायक निबंधकांनी एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली नोटीस खोडसाळपणाने व कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने प्रसिद्ध केल्याचे दिसून येत आहे.

Shalinitai Patil
70 मिनिटं 21 बॉम्बस्फोट, 56 जणांचा मृत्यू, 13 वर्षानंतर न्याय!

कारखान्याचा फार्मल पझेशन इडीने दोन जुलै २०२१ रोजी घेतला आहे. सध्या कारखाना इडीच्या ताब्यात आहे व कारखान्याबाबत कोणताही निर्णय घेताना इडीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. असे असताना तसेच कारखान्याच्या वतीने मुंबई येथील डीआरएटी कोर्टात दावा सुरू आहे. त्यात कारखान्याचा विक्री व्यवहार रद्द होऊन कारखाना पुन्हा सभासदांना मिळावा, ही मागणी केली आहे. सिक्युरिटायझेन कायदा शेतकऱ्यांच्या संस्थेस लावता येत नाही व त्या कायद्यानुसार बँकेने कारखान्याची केलेली विक्री रद्द करावी, अशी मागणी केली आहे. तेरणा सहकारी साखर कारखान्याची निविदा प्रक्रिया नुकतीच डीआरएटी कोर्टाने रद्द केली आहे. त्या धर्तीवर आपल्या कारखान्यास न्याय मिळणार आहे. डिस्टिलरी प्रकल्पही नजीकच्या काळात सभासदांना मिळणार आहे, तसेच कारखान्याबाबतही योग्य तो निर्णय नजीकच्या काळात लागणार आहे, याची कल्पना संबंधितांना असल्यामुळे सत्तेचा व शासकीय अधिकाऱ्यांचा गैरवापर करून हे सर्व प्रकार सुरू आहेत. हे कोणीही गांभीर्याने घेऊ नयेत, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी या पत्रकाद्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com