पाटणमध्ये हातोडा फिरणार?; मिळकतधारकांना अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा

अरूण गुरव
Saturday, 5 December 2020

पाटण येथील केरा पुलापासून रामापूरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला विस्तारलेली बाजारपेठ आणि त्या ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या मिळकतधारकांना अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा संबंधित विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मिळकतधारक मालकांवर अतिक्रमणाची टांगती तलवार कायम आहे.

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील नवारस्ता आणि मल्हापेठ येथे वाहतुकीची कोंडी होत होती. कऱ्हाड ते चिपळूण या राज्यमार्गाच्या मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला अनेक वर्षे संसार थाटलेल्या टपऱ्या, स्टॉल, मंडप दुकाने, घरे अशा अतिक्रमणांवर बांधकाम विभागाने जेसीबी फिरवल्याने इतकी वर्षे घुसमटलेल्या या रस्त्याने मोकळा श्वास घेतला. एकीकडे नवारस्ता, मल्हारपेठ या ठिकाणांवरील अतिक्रमणे काढण्यात आली असताना मग पाटणचा दबलेला श्वास मोकळा कधी होणार, याकडे तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. 

नवारस्ता येथे बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात जेसीबी घेऊन अतिक्रमणविरोधात कारवाई केली. पाटण येथील बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन, महसूल यंत्रणा यांनी मोठ्या ताकदीने ही कारवाई केली. प्रथमच एवढी मोठी कारवाई होत असल्याने परिसरातील लोकांची गर्दीही झाली होती. दिवसभर या कारवाईची चर्चाही सुरू होती. मल्हापेठ येथे कऱ्हाड ते चिपळूण रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करताना त्या ठिकाणीसुद्धा अतिक्रमणे काढून रस्त्याचे काम करण्यात आले. मुख्य बाजारपेठ असलेल्या दोन्ही ठिकाणची अतिक्रमणे काढल्याने येथे वाहतुकीची कोंडी कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. 

टॉवरच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; अज्ञानामुळे अनेकांना बसला लाखोंचा फटका

पाटण येथील केरा पुलापासून रामापूरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला विस्तारलेली बाजारपेठ आणि त्या ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या मिळकतधारकांना अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा संबंधित विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मिळकतधारक मालकांवर अतिक्रमणाची टांगती तलवार कायम आहे. नवारस्ता, मल्हारपेठ या ठिकाणांवरील अतिक्रमणे काढण्यात आली. तर मग पाटणचा दबलेला श्वास मोकळा कधी होणार, याकडे तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. गुहागर ते विजापूर असा राष्ट्रीय महामार्ग पाटण शहरातून जातो. गेल्या दोन वर्षांपासून कऱ्हाडपासून चिपळूणपर्यंत रस्ता रुंदीकरण, दुपदीरकरण, सिमेंट कॉंक्रिटीकरण करून रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. पाटण हे शहर असून तालुक्‍याचे ठिकाण आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने येथे वाहतूक कोंडी होत असते. कऱ्हाड ते चिपळूण या रस्त्याचे काम गतीने सुरू करावे, याकरिता राजकीय पक्षांनी आंदोलने केली. वाहतूक कोंडीबाबत त्यामुळे पाटण शहरात सम-विषम तारखेला पार्किंग व्यवस्था राबवण्यात आली. तरीसुद्धा वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही कायम आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice Regarding Removal Of Roadside Encroachments At Patan Satara News