
अखेरच्या घटका मोजताहेत ३५० इमारती
सातारा - कायदेशीर प्रक्रिया, ताब्यावरून असणाऱ्या वादात अडकलेल्या शहरातील सुमारे साडेतीनशे मिळकती धोकादायक झाल्या आहेत. या धोकादायक इमारतींमुळे जीवित, तसेच वित्तहानी होऊ नये, यासाठी पालिकेने त्या संबंधित इमारत मालकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. या नोटिसांमध्ये त्या इमारती स्वत:हून पाडण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. मुदतीत कार्यवाही न झाल्यास पालिका ठेकेदाराच्या मदतीने त्या पाडणार आहेत.
शहरात अनेक जुन्या इमारती, वाडे व घरे आहेत. त्यापैकी अनेक मिळकतींच्या अनुषंगाने अनेक ताबा प्रक्रियेवरून न्यायालयीन वाद सुरू असल्याचे समोर येत आहे. न्यायालयीन वाद सुरू असल्याने या मिळकतींची दुरुस्ती देखील होत नसल्याने त्या दिवसेंदिवस धोकादायक बनत आहेत. राहती जागा सोडल्यास ताब्याचा प्रश्न निर्माण होईल, या भीतीने अनेक कुटुंबे अशा धोकादायक इमारती, वाडे, घरांमध्ये वास्तव्यास आहेत. काही मिळकती वापराअभावी पडून आहेत. धोकादायक मिळकतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ती जागा सोडण्याच्या नोटिसा पालिकेने बजावल्या होत्या, मात्र त्यांनी त्या सोडलेल्या नाहीत. सततचा पाऊस, देखभालीअभावी धोकादायक इमारती कोसळून त्याठिकाणी राहणाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी मध्यंतरीच्या काळात पालिकेने अशा धोकादायक आणि अतिधोकादायक मिळकतींचे सर्वेक्षण व वर्गवारी केली.
या सर्वेक्षणात शहरात वापराअभावी धोकादायक बनलेल्या शंभर इमारती धोकादायक आहेत. त्याठिकाणी नागरिकांचे वास्तव्य असणाऱ्या अडीचशे मिळकती असल्याचे समोर आले. यानुसार पालिकेने त्या मिळकती पाडण्यासाठीच्या नोटिसांमुळे मिळकतधारकास बजावण्यास सुरुवात केली आहे. या नोटिसांत संबंधित धोकादायक मिळकत पाडण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राजपथावरील एक इमारत कोसळली होती. या खाली सापडल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
ठेकेदाराची नेमणूक
धोकादायक इमारत दिलेल्या मुदतीत न पाडल्यास ती पाडण्यासाठी पालिका पुढाकार घेणार आहे. यासाठी पालिकेने ठेकेदाराची नेमणूक केली आहे. ठेकेदाराच्या मदतीने आगामी काळात धोकादायक, तसेच अतिधोकादायक वर्गवारीनुसार त्या मिळकती पाडण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेकडून कार्यवाहीस सुरवात होण्यापूर्वी मिळकतधारक स्वतःहून धोकादायक इमारती उतवून घेणार का? याकडे शहरवासियांच्या नजरा लागून आहेत.
शेजाऱ्यांचा जीव टांगणीला…
अनेक धोकादायक इमारतीच्या लगत असणाऱ्या मिळकतधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. शेजारील धोकादायक इमारत आपला कर्दनकाळ ठरू नये, याची अनेक मिळकतधारक प्रार्थना करत आहेत. त्यामुळे वादात अडकलेल्या धोकादायक इमारतीची मिळकतधारकांपेक्षा शेजारी वास्तव्यास असणाऱ्या मिळकधारकांना काळजी लागून आहे.
Web Title: Notices To Dangerous Building Owners In Satara City
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..