पोलिस भरतीच्या सरावात सातत्य ठेवल्यास यश निश्‍चित : पंकज शिरसाठ

रमेश धायगुडे
Sunday, 18 October 2020

पोलिस भरतीत शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षा घेतली जाते. त्यात साधारण पाच विषयांचा समावेश असतो. त्यात गणित, सामान्य विज्ञान, बुध्दीमापन, मराठी व्याकरण, चालू घडामोडींवर प्रश्न असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव, वाचन, वृत्तपत्राचे वाचन, शासन व्यवस्था, राज्य घटनेचा अभ्यास करावा, असे आवाहन प्रा. सोनवणे यांनी केले.

लोणंद (जि. सातारा) : विद्यार्थ्यांनी पोलिस भरतीची तयारी करताना सर्वप्रथम आपण त्यासाठी पात्र आहोत का, हे पाहूनच भरतीची पूर्वतयारी करावी. पोलिस भरतीची तयारी करताना विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमता चाचणी तयारीसोबत लेखी परीक्षेच्या सरावात सातत्य ठेवल्यास यश निश्‍चित मिळेल, असे प्रतिपादन ठाणे पोलिस आयुक्तालयाचे सहायक पोलिस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी केले. 

रयत शिक्षण संस्थेच्या येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पोलिस भरतीपूर्व मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. शिरसाठ "भरतीपूर्व फिजिकल फिटनेस काळाची गरज' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप होते. तसेच व्याख्याते एव्हरेस्ट करिअर ऍकॅडमीचे प्रा. पोपटराव सोनवणे हेसुध्दा उपस्थित होते. 

श्री. शिरसाठ यांनी पोलिस भरतीची शारीरिक क्षमता चाचणीची तयारी कशी करावी, याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये होणारे 100, 1600 मीटर धावणे, गोळाफेक, लांबउडी, छाती कशा पध्दतीने फुगवावी, किती वेळेत आपण धावणे पूर्ण केले पाहिजे, किती मीटरपर्यंत गोळा फेकला पाहिजे व त्यासाठी गुण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येक प्रकारात पैकीच्या पैकी गुण मिळविण्याचे ध्येय सर्वांनी ठेवले पाहिजे. सरावाबरोबर आहाराचे महत्त्वही त्यांनी सांगितले.

गुन्हेगारी माेडीत काढणे हेच माझे ध्येय : आंचल दलाल 

प्रा. सोनवणे हे "पोलिस भरती 2020 लेखी परीक्षेची तयारी करताना' या विषयावर बोलताना म्हणाले, "शारीरिक क्षमता चाचणीनंतर लेखी परीक्षा घेतली जाते. त्यात साधारण पाच विषयांचा समावेश असतो. त्यात गणित, सामान्य विज्ञान, बुध्दीमापन, मराठी व्याकरण, चालू घडामोडींवर प्रश्न असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव, वाचन, वृत्तपत्राचे वाचन, शासन व्यवस्था, राज्य घटनेचा अभ्यास करावा. तसेच ज्या जिल्ह्यात भरतीसाठी जाणार आहात, त्या जिल्ह्याची सर्व माहिती असणे आवश्‍यक आहे.'' प्राचार्य डॉ. घोलप यांनी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व स्पर्धा परीक्षा उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. बी. राठोड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. एम. ए. पठारे, प्रा. सागर शेंडे, डॉ. संदीप कवडे, प्रा. नंदकुमार साळुंके आदींनी सहकार्य केले. सदर ऑनलाइन व्याख्यानाचा लाभ 270 विद्यार्थ्यांनी घेतला.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Police Pre-recruitment Guidance Lecture Series For Students By Sharadchandra Pawar College At Lonand Satara News