कोरोनाजन्य आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांचे भरीव काम : अविनाश फडतरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाजन्य आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांचे भरीव काम : अविनाश फडतरे

सातारा जिल्ह्यातील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षकांच्या यशोगाथा उलगडणाऱ्या "तंत्रस्नेही शिक्षक' या पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशनाचा कार्यक्रम नुकताच झाला.

कोरोनाजन्य आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षकांचे भरीव काम : अविनाश फडतरे

सातारा  : प्राथमिक शिक्षकांकडून नवी पिढी घडविण्याचे, शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे काम केले जाते. अशा शिक्षकांना नेहमीच पाठबळ देण्याचे काम "सकाळ'ने केले आहे, ते स्तुत्य, कौतुकास्पद आहे, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी व्यक्त केले.
 
जिल्ह्यातील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षकांच्या यशोगाथा उलगडणाऱ्या "तंत्रस्नेही शिक्षक' या पुस्तकाच्या ऑनलाइन प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे (माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे (प्राथमिक), "सकाळ'चे सरव्यवस्थापक उमेश पिंगळे, सहयोगी संपादक राजेश सोळसकर, वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर, पुस्तकाचे लेखक सुनील शेडगे यांची उपस्थिती होती. "सध्याची कोरोनाजन्य परिस्थिती आव्हानात्मक होती. अशा प्रसंगी विविध घटकांप्रमाणेच जिल्ह्यातील शिक्षकांनी भरीव काम केले. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अशा मोहिमेत शिक्षकांनी आपले योगदान दिले. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचे काम केले. "सकाळ' अशा सकारात्मक बाजू नेहमीच समाजासमोर आणण्यासाठी प्रयत्नशील असतो, असेही श्री. फडतरे यांनी नमूद केले.
 
राजेश क्षीरसागर यांनी "सकाळ'ने "उपक्रमशील शिक्षक' या लेखमालेपाठोपाठ अल्पावधीतच "तंत्रस्नेही शिक्षक' ही लेखमाला प्रसिद्ध केली. ती पुस्तकरूपाने आकारास येत आहे. त्यानिमित्ताने "सकाळ'ने आणखी एक चांगला उपक्रम हाती घेतला. जिल्ह्यातील शिक्षकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविधांगी उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोचविल्याचे सांगितले. येत्या काळात माध्यमिक शिक्षकांचेही शैक्षणिक कार्य "सकाळ'ने समाजासमोर आणावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
 
धनंजय चोपडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. "शाळा बंद, शिक्षण सुरू' या मोहिमेत जिल्ह्यातील शिक्षकांनी चांगले काम केले. ऑनलाइन शिक्षणाच्या नव्या तंत्राने अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावीपणाने राबविली. "सकाळ'च्या लेखमालेमुळे असे विविध उपक्रम अन्य शिक्षक, विद्यार्थी, समाजापर्यंत पोचण्यास हातभार लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
रवींद्र खंदारे यांनी या लेखमालेच्या लेखनातून जिल्ह्यातील शिक्षकांचे चांगले काम समाजापुढे आले. त्यातून जिल्ह्यातील इतर शिक्षकांनाही प्रेरणा देण्याचे काम झाल्याचे सांगितले. पुस्तकाचे लेखक सुनील शेडगे यांनीही आपले विचार व्यक्त केले. 

महिलांना मिळणार 'मैत्रिण'ची साथ, बक्षीस जिंकून करणार संकटांवर मात

जिल्ह्याच्या विविध भागांत विद्यार्थ्यांसाठी सदैव धडपडणारे, अध्यापनाची नानाविध तंत्रे, कौशल्ये वापरणारे, खडतर परिस्थितीतही झपाटून काम करणारे, प्रतिकूल वातावरणातही विद्यार्थीहित जोपासणारे कित्येक तंत्रस्नेही शिक्षक या लेखमालेतून समाजासमोर आले. अर्थात ही केवळ शिक्षकांची प्रातिनिधिक रूपे होती. अजूनही कित्येक शिक्षक प्रसिद्धीच्या पटामागेच राहिले, तरीही विद्यार्थी हे दैवत मानून काम करणारे शिक्षक जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सहयोगी संपादक राजेश सोळसकर यांनी प्रास्ताविकात पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट केली. "तंत्रस्नेही शिक्षक' या पुस्तकाचा जन्म शिक्षकांची धडपड, त्यांनी अवगत केलेले शिक्षणातील तंत्र, अंगीकारलेले कौशल्य यातून झाला असल्याचे ते म्हणाले. वरिष्ठ व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी कार्यक्रमासाठीच्या उपस्थितांचे आभार मानले. या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात जिल्ह्याच्या विविध भागांतील तंत्रस्नेही शिक्षक सहभागी झाले होते.

चारुदत्त आफळेंना सातारा भूषण पुरस्कार जाहीर
 

loading image
go to top