कुटुंबाला फक्त दोन घागरी पाणी, डोंगर माथ्यावर मुंबईकरांसह स्थानिक हैराण

Satara
Satara

ढेबेवाडी (जि. सातारा) ः पाण्याचे स्रोत आटल्याने डोंगर पठारावर वसलेल्या कोळेकरवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांची अक्षरशः वणवण सुरू आहे. लॉकडाउनच्या काळात मोठ्या संख्येने गावी आलेले मुंबईकर व स्थानिक नागरिक सध्या तेथील कठीण परिस्थितीशी सामना करत असून, प्रत्येक कुटुंबांच्या वाटणीला कसेबसे दोन घागरी पाणी येत असल्याने त्यातूनच सारा मेळ घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. 

कोळेकरवाडीत ग्रॅव्हिटी नळयोजनेला जिथून पाणीपुरवठा होतो, तो झरा आटला आहे. या योजनेची पाणी साठवण टाकी 67 हजार लिटर क्षमतेची असून, 384 नळ कनेक्‍शन आहेत. झऱ्यातून येणारे थोडे- थोडे पाणी सध्या टाकीत साठवले जात असले, तरी प्रत्येक कुटुंबाच्या वाटणीला एक-दोन घागरीच पाणी येत असल्याने त्यातीलच थोडेफार पिण्यास ठेवून धुणी-भांडी, जनावरे आणि इतर खर्चास लागणाऱ्या पाण्याचा मेळ घालायचा कसा असा प्रश्न सर्वांसमोरच उभा आहे. लॉकडाउनच्या काळात मोठ्या संख्येने गावी आलेले मुंबईकर आणि स्थानिक नागरिक सध्या तेथील कठीण परिस्थितीशी सामना करत आहेत. गावातील खासगी कूपनलिका पाण्याचे स्रोत आटल्याने बंद आहेत. दोन सार्वजनिक कूपनलिकेपैकी एक सुरू असली, तरी तिच्यावर आख्खे गाव पाण्यासाठी गर्दी करत असल्याने गावात पाच स्वतंत्र विभाग करून प्रत्येक विभागातील नागरिकांना पाणी भरण्यासाठी दिवसभरात एक तास वेळ निश्‍चित करून देण्यात आलेला आहे. त्या वेळेत कूपनलिकेवर पाण्यासाठी झुंबड असते. घागरी-हंड्याच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. 


ठोस पावले उचलण्याची गरज... 

गावात हजारभर मुंबईकरांचे आगमन झाले आहे. पाण्याच्या उपलब्ध स्त्रोतांवर ताण वाढल्याने पाण्याचा काटकसरीने वापर एवढाच आता त्यावर उपाय असल्याचे उपसरपंच एल. डी. कोळेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ""पावसाळा जवळ आल्याने आता टॅंकर सुरू होणेही कठीण आहे. या समस्येतून कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवीन नळयोजनेसाठी हालचाली करत असताना जलसंधारणाची कामे वाढवून भविष्यात पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी नवनवीन संकल्पना राबविणार आहोत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com