काेराेनाच्या सावटातही "यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट' चा गजर

संताेष चव्हाण
Wednesday, 27 January 2021

भाविकांनी नाकाबंदी केलेल्या ठिकाणी 10 किलोमीटर अंतरावरच लावलेल्या स्क्रीनवर खंडोबा- म्हाळसा विवाह सोहळ्याचे दर्शन घेत भंडाऱ्याची उधळण करत परतीचा मार्ग धरला.

उंब्रज (जि. सातारा) : "यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट'च्या जयघोषात महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील श्री खंडोबाची यात्रा मानकरी व मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत नुकतीच झाली. दरम्यान गोरज मुहूर्तावर खंडोबा व म्हाळसाकांत विवाह सोहळा पार पडला. एरव्ही गजबजलेला वाळवंट सुना-सुना होता.
 
विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी फौजफाटा तैनात केला होता. पालमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे नेहमीप्रमाणे भाविकांनी भरगच्च असणारे वाळवंट सुने-सुने होते. देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून दुपारी मिरवणुकीस प्रारंभ झाला. सोहळ्यासाठी मानकरी, वऱ्हाडी उपस्थित होते. "यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदचा यळकोट' चा गजर करत मानकरी व कारखाना मंदिरात गेला.

देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी मानकरी म्हणून देव घेऊन बसण्याचा मान त्यांचे चिरंजीव तेजराज पाटील यांना दिला. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांनी दर्शन घेतल्यावर तेजराज पाटील हे देवतांच्या मुखवट्यासह फुलांनी सजवलेल्या जीपमध्ये विराजमान झाले. यानंतर मुख्य प्रवेशद्वारातून मिरवणूक बाहेर येताच वऱ्हाडी मंडळीनी "यळकोट यळकोट जय मल्हार, सदानंदाचा यळकोट' असा जयघोष करीत भंडारा व खोबऱ्याची उधळण केली. गोरज मुहूर्ताअगोदर विवाह मंडपात ते पोचले. बाहुल्यावरती वऱ्हाडी मंडळींचा मानपानाचा विधी झाल्यावर गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, उंब्रजचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड व कर्मचारी उपस्थित होते. भाविकांनी नाकाबंदी केलेल्या ठिकाणी 10 किलोमीटर अंतरावरच लावलेल्या स्क्रीनवर खंडोबा- म्हाळसा विवाह सोहळ्याचे दर्शन घेत भंडाऱ्याची उधळण करत परतीचा मार्ग धरला.

बंदूक चालविणाऱ्या हाती जेव्हा कुंचला येतो! जवान प्रदीप चव्हाणांच्या चित्रांचे देशभर प्रदर्शन

स्कूल चले हम! पाठीवर दप्तर, खांद्यावर हात टाकत बालमित्र पाेचले शाळेत

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pal Khandoba Yatra Satara Marathi News