लई भारी...साताऱ्यातील पठ्ठ्याने पाणीपुरी विकून मिळविले दहावीत यश

दिलीपकुमार चिंचकर
गुरुवार, 30 जुलै 2020

आई, वडीलांच्या डोळ्यातील आनंदश्रु पाहून शाळेचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांचे मनही हेलावले. ते म्हणाले कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही, आत्मविश्‍वासाने प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थी चमकतात. महेंद्रचे यश आपण पाहतच आहात.

सातारा : गाव मध्यप्रदेशात. मातृभाषा हिंदी. पण पठ्ठयाने साताऱ्यात पाणीपुरी विकत शाळा शिकली. फक्त शिकलाच नाही तर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येते हा धडा श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल मधील महेंद्र बघे याने सर्वापुढे ठेवला आहे. दहावीच्या परिक्षेत त्याने मिळविलेल्या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे. 

विद्या घ्यायचीच ठरवले तर परिस्थिती, काळ, वेळ कसलीही प्रतिकुलता शिक्षण घेण्यात आणि त्यात यश मिळविण्यात कोणतीही अडचण ठरु शकत नाही. हे पाणीपुरीच्या गाडीवर काम करणाऱ्या येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल मधील महेंद्र जगतसिंग बघेल या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत 72.40 टक्के गुणांसह शाळेत दुसरा तर मुलांत पहिला क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे महेंद्रच्या कुटुंबियाची मातृभाषा हिंदी आहे.

कोरेगावातील प्रथमेशच्या मुकुंद मिश्राने बनवलं लाखाे नेटकऱ्यांना भावुक
 
 महेंद्रचे आई -वडील उदरनिर्वाहासाठी मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथून 20 वर्षांपुर्वी सातारा शहरात आले. भाड्याने खोली मिळेल तेथे रहायचे, मिळेल ते काम करायचे अन जिवन जगायचे. एकेदिवशी त्यांनी छोटा पाणीपुरीचा ठेला सुरु करायचे ठरविले. शहरातील चौपाटी समजल्या जाणाऱ्या राजवाडा परिसरात ते पाणीपुरी विकू लागले. परिस्थिती बिकट असली तरी आपल्या मुलाला आणि मुलीला उत्तम शिक्षण दिले पाहिजे असा त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला.

SSC Result : सातारा जिल्ह्यातील 38 हजार 688 विद्यार्थीं यशस्वी ; तुमच्या तालुक्याचा निकाल पाहा

त्यातूनच त्यांनी राजवाडानजीकच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये त्याला घातले. महेंद्र हा अतिशय अभ्यासू. त्यालाही शिक्षणाची मोठी आवड. ठेल्यावर वडील एकटे असल्याने त्याला आपल्या कुटुंबाच्या व्यवसायास हातभार लावणे भाग पडायचे. पाणीपुरीचा धंदा सायंकाळी जास्त चालतो. त्यामुळे दिवसभर शाळा झाली की महेंद्र सायंकाळी सहा पासून रात्री नऊ - साडेनऊ पर्यंत वडीलांना पाणीपुरीच्या ठेल्यावर मदत करायचा. सकाळी शाळा, सायंकाळी कुटुंबास मदत करणे आणि पुन्हा घरी पतल्यावर रात्री अभ्यासास बसणे असा त्याचा दिनक्रम असे. शाळेतील शिक्षक, मित्र यांच्या मदतीने तो अवघड वाटणारी गोष्ट समजून घ्यायचा. त्याची अभ्यासातील गोडीने आणि जिद्द व चिकाटीमुळे आज त्याने दहावीच्या परिक्षेत 72.40 टक्के मिळविल्याचा आनंद त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर झळकत होते.

Video : पर्यटकांनाे, सेल्फीपेक्षा जीव मोलाचा..! कास धरणावर असे वागू नका

आई, वडीलांच्या डोळ्यातील आनंदश्रु पाहून शाळेचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांचे मनही हेलावले. ते म्हणाले कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही, आत्मविश्‍वासाने प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थी चमकतात. महेंद्रचे यश आपण पाहतच आहात. सर्व शिक्षकवृंद आणि पालकांच्या प्रोत्साहनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले असल्याचे देशमाने यांनी नमूद केले.  

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panipuri Vendor From Satara Bagged Good Marks In SSC