कोरेगाव पोलिसांचा फार्म हाऊसवर छापा; पनवेलचे चार अटकेत

राजेंद्र वाघ
Monday, 21 September 2020

या महिलेचे कोप्रोलीगाव येथे राहणाऱ्या एका युवकाशी अनैतिक संबंध होते. त्याने संबंधित महिलेकडून घेतलेल्या पैशांवरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. या वादातूनच त्याने साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याची व गुन्हा दाखल झाल्यापासून तो गावातून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

कोरेगाव (जि. सातारा) : आकुर्ली (पनवेल) येथील एका महिलेच्या खून प्रकरणाशी संबंधित फरार असलेल्या व कोरेगाव परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये लपून बसलेल्या चौघा संशयितांना कोरेगाव पोलिसांच्या मदतीने पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पनवेल पोलिसांकडून माहिती मिळताच त्यांचे पथक दाखल होण्यापुर्वीच कोरेगाव पोलिसांनी 'त्या' फार्म हाऊसवर तत्काळ छापा घातल्याने संशयितांना हालचाली करण्यास वावच राहिला नाही आणि ते अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले.
 
मोरबे (ता. पनवेल) गावाच्या हद्दीतील मोरबे धरणाच्या जलाशयामध्ये रस्सीने व तारेने एका 48 किलो वजनाच्या सिमेंटच्या पोलभोवती समांतर गुंडाळून बांधलेल्या स्थितीत अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याचे बुधवारी (ता.16 ) सकाळी साडेआठच्या सुमारास निदर्शनास आले होते. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिस निरिक्षक अशोक राजपूत यांनी तपास सुरू केला. मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हता; परंतु मृत महिलेच्या एका हातातील बांगड्या व गोंदलेल्या चिन्हावरून मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. आकुर्ली (पनवेल) येथील एका 27 वर्षे वयाच्या महिलेचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. या महिलेचे कोप्रोलीगाव येथे राहणाऱ्या एका युवकाशी अनैतिक संबंध होते. त्याने संबंधित महिलेकडून घेतलेल्या पैशांवरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. या वादातूनच त्याने साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केल्याची व गुन्हा दाखल झाल्यापासून तो गावातून पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अधिकमासात लाडक्या जावईबापूंच्या वाणाचे बदलले स्वरूप! तांब्याची भांडी व तेहेतीस पदार्थांना महत्व 
 

मुख्य संशयित हा साथीदारांसमवेत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरात फिरत असून, संशयितांसोबत मृत महिलेची लहान मुलगी देखील असल्याचे समजताच पनवेल पोलिसांनी ही माहिती कोरेगाव पोलिसांना कळवली. त्यानंतर कोरेगावचे पोलिस निरिक्षक सुनिल गोडसे, उपनिरिक्षक विशाल कदम, सहायक फौजदार प्रल्हाद पाटोळे, कॉन्स्टेबल किशोर भोसले, अजित पिंगळे, प्रशांत लोहार यांनी शोध घेऊन कोरेगाव परिसरातील एका फार्म हाऊसमध्ये लपून बसलेल्या चौघा संशयितांना शुक्रवारी (ता.18) ताब्यात घेतले.

खंबाटकीच्या 'एस' वळणावर सुरक्षिततेच्या अनाेख्या उपाययाेजना 

पनवेल पोलिसांचे तपास पथक कोरेगावात दाखल होताच चौघांनाही या पथकाच्या स्वाधीन केले. त्यांनंतर संशयितांना पनवेल येथे नेऊन चौकशी केली असता, गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर रविंद्र रामा ठाकूर, अक्षय संतोष पांचाळ, शशिकांत लक्ष्मण पाटील (तिघेही रा. कोप्रोली, पनवेल), निलेश भरत फडके (रा. नेरे, पनवेल) अशी संशयितांना अटक केलेल्यांची नावे आहेत. 

अबब.. पाटणमध्ये आढळला साडेआठ फुटाचा भलामोठा अजगर

या सर्वांना 25 सप्टेंबरर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्यासमवेत मृत महिलेची सात वर्षांची मुलगी देखील मिळून आली. तिच्याबाबत पनवेल (रायगड) येथील बाल कल्याण अधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त करून घेऊन तिला सुरक्षिततेसाठी बालगृहात ठेवण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panvel Police Arrested Four Youth In Koregoan Satara News