सातारा रस्त्यांवर अवजड वाहनांची पार्किंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा रस्त्यांवर अवजड वाहनांची पार्किंग

कात्रज : सातारा रस्त्यांवर गुजरवाडी फाटा परिसरात मोठ्या प्रमाणांवर रस्त्यांच्या दुतर्फा अवजड वाहनांची पार्किंग करण्यात येत आहे. सातारा रस्त्यांवर किनारा हॉटेलपासून गंधर्व लॉन्सपर्यंत बॉटलनेकसारखी परिस्थिती असताना रस्त्यांवरच वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहनचालकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. तसेच, पेट्रोल पंपावरून रस्ता ओलांडताना अपघाताची शक्यता निर्माण होत आहे.

अवजड वाहने, डंपर अशा वाहनांची रस्त्यांवर रहदारी असते. त्यातच वाहनांची अनाधिकृत पार्किंग केली जात असल्याने या परिसरातून वाहन चालवणे जिकीरीचे झाले आहे. शनिवार-रविवारी तर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. मात्र, रहदारीच्या तुलनेने रस्त्याची क्षमता अपुरी पडत आहे. त्याचबरोबर, रस्त्यावर मोठ्या प्रमाणांत खड्डे पडले असून रस्त्याच्या दुतर्फा कचरा-राडारोडा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची दूरवस्था झाली असून पुढे स्वागत हॉटेलजवळ रस्त्याच्या बाजूला खडी पडल्याचे दिसत आहे. त्यामुळेही अपघात होत आहेत.

गुजरवाडी फाटा ते मांगडेवाडीपर्यंत स्ट्रीट लाईटची आवश्यकता आहे. परंतु कुठेही स्ट्रीटलाईट बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाने यावर ठोस उपायोजना करण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिक शुभम मांगडे यांनी म्हटले आहे.

शहराचे प्रवेशद्वार असून सुध्दा अनेक वर्षापासून महापालिकेने येथील समस्याकडे दूर्लक्ष केले आहे. वाहतूक कोंडी-पार्किंगसारख्या प्रश्नांवर अद्यापही ठोस उपाययोजना नाही. वाढती रहदारी पाहता महापालिकेने नव्याने समाविष्ट गावाच्या हद्दीपर्यंतच्या रस्त्याचे रूंदीकरण करण्याची गरज आहे.

- आदित्य गायकवाड, वाहनचालक

पोलिस सातत्याने दंडात्मक कारवाई करत आहेत. मात्र, रहदारीच्या तुलनेने रस्त्याची क्षमता अपुरी असून रस्ता अरुंद आहे. अवजड वाहनांची पार्किंग करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून आणखी कडक कारवाई करण्यात येईल.

- प्रताप मानकर, पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ (वाहतूक)

loading image
go to top