पाटण : वर्षानंतरही भूस्खलनग्रस्तांच्या पदरी निराशाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

landslide

पाटण : वर्षानंतरही भूस्खलनग्रस्तांच्या पदरी निराशाच

पाटण : अतिवृष्टीतील भूस्खलनाच्या दुर्घटनेला उद्या (ता. २२) एक वर्ष पूर्ण होत आहेत. मध्यरात्रीच्या मुसळधार पावसात डोंगर उतार खचून झालेल्या भूस्खलनात निरापराध लोकांसह जनावरांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. पिकांची दैना झाली. त्या घटनेला वर्षांचा कालावधी लोटला.

मात्र, मागे वळून पाहताना लोकप्रतिनिधी व शासनाने आपत्तीग्रस्तांना काय दिले? हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे. भूस्खलनग्रस्तांच्या पदरी निराशाच असल्याने मदतीचा फार्स झाला का, असा भूस्खलनग्रस्तच प्रश्न विचारत आहेत. आजही मुसळधार पाऊस कोसळू लागला की, त्या भागातील लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे.

नैसर्गिक आपत्ती व पाटण तालुका एक समीकरण आहे. तालुक्यावर ५५ वर्षांत दोन नैसर्गिक आपत्तींनी घाला घातला. दोन्ही घटनांची पार्श्र्वभूमी रात्र आणि मुसळधार पाऊस अशी आहे. पहिली घटना ५५ वर्षांपूर्वी ११ डिसेंबर १९६७ च्या पहाटे घडली होती. मुसळधार पाऊस आणि भूकंपाचा धक्का अशा दोन नैसर्गिक आपत्ती तालुक्यावर कोसळल्या. सकाळी संपूर्ण तालुक्यात हाहाकार माजला होता. जुन्या पद्धतीची घरे जमीनदोस्त झाली.

हजारो नागरिकांचा जीव गेला अन् हजारो कुटुंबे रस्त्यावर आली. या घटनेच्या आठवणीने आजही तालुकावासीय हळहळतात. दुसरी नैसर्गिक आपत्ती गेल्या वर्षी २२ जुलैच्या पहिल्या चरणात पहाटे घडली. रात्रीची वेळ आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच २४ तासांत विक्रमी ७५० मिलिमीटर पाऊस बरसला. यावेळी भूकंपाची जागा भूस्खलनाने घेतली. अतिवृष्टीमुळे डोंगरउतार खचले, रात्री गाढ झोपेत असलेल्या निरापराधांच्या घरांवर आले. झोपेत असलेल्या लोकांना संधीही मिळाली नाही.

प्रशासकीय यंत्रणा प्रभावीच

भूस्खलनाच्या आपत्तीत अनेकांनी हातभार लावला. जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तत्कालीन तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस प्रशासन, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदत कार्यात जीव धोक्यात घालून प्रभावीपणे राबविलेली यंत्रणा तालुक्यातील जनता कधीही विसरणार नाही. आजही त्या घटनेतील काही प्रसंग तालुक्यात कायम लोकांच्या चर्चेत असतात.