इनकमिंगने वाढतोय पाटणचा कोरोना रेट, गावागावांत सापडताहेत मुंबई व पुण्यातून आलेले रुग्ण

Satara
Satara

पाटण (जि. सातारा)  : कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह रुग्ण पाटण तालुक्‍याच्या गावागावांत सापडू लागले आहेत. सापडणारे रुग्ण हे मुंबई व पुण्यासारख्या शहरांतून तालुक्‍यात इनकमिंग झालेले आहेत. गेली साडेतीन महिने प्रशासन तालुका कोरोनामुक्तीसाठी जिवाचे रान करत आहे. मात्र, शहरांतून इनकमिंग झालेल्या लोकांना या महामारीचे गांभीर्य नसल्याने आता दररोज कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढतो आहे. शहरांतून तालुक्‍यात येणारांनी इनकमिंग तरी थांबवावे किंवा आल्यानंतर दक्षता घेण्याचे भान ठेवावे, असा सूर तालुक्‍यातील जनतेतून व्यक्त होत आहे. 

महिन्यापूर्वी म्हणजे एक मे रोजी शासनाने लॉकडाउन शिथिल केले आणि मुंबई-पुण्यासारख्या शहरांतून व इतर राज्यांतून तालुकावासीयांचे इनकमिंग सुरू झाले. 22 मार्च ते एक मे पर्यंत डेरवणचा अपवाद सोडला तर तालुका कोरोनापासून दूरच होता. मात्र, इनकमिंग सुरू झाले आणि दोन महिने प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीवर पाणी फेरले. बनपुरीच्या सार्वजनिक इमारतीत क्‍वारंटाइन असणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर तिचा घेतलेला स्वॅब नमुना पॉझिटिव्ह आला आणि तालुका हादरला. ढेबेवाडी विभागात सुरुवात झाली आणि त्याचे लोण तालुक्‍याच्या इतर भागात पोचले. गुजरात राज्यातील सुरत शहरातून आलेल्यांनी तर धुमाकूळ घातला. आजपर्यंत एकूण 111 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले असून, क्‍वारंटाइन कक्षात पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासातील 99 लोकांवर उपचार केले आहेत. कोरोनामुळे सहा लोकांचा मृत्यू झाला असून 68 पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कऱ्हाडला 37 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे 44 गावांना झळ पोचली असून, सध्या 21 गावे सील करण्यात आली आहेत. 

तालुक्‍यात सापडलेले रुग्ण हे स्थानिक रहिवाशी नाहीत. हे सर्व रुग्ण मुंबई, पुणे व सुरतसारख्या शहरांतून आलेले आहेत. त्यांच्या इनकमिंगमुळे संपूर्ण तालुका आज कोरोनाच्या दहशतीखाली आहे. शहरांतून इनकमिंग झालेले 14 दिवसांचा क्‍वारंटाइनचा कालावधी पाळत नाहीत. कुटुंबासह घरात एकत्र राहतात. दोन-अडीच महिने दहा बाय दहाच्या खोलीत राहिलेले गावाकडे आले की हापचड्डी घालून गावभर मोकाट फिरत आहेत.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका सर्व्हेला गेल्यातर उद्धटपणा करतात. गावच्या सरपंच किंवा पोलिस पाटलालाही जुमानत नाहीत. त्याचबरोबर त्यांचे नातेवाईकही सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव तालुकाभर पसरू लागला आहे. रोज नवीन रुग्ण सापडत आहेत. रुग्ण सापडला की आरोग्य, महसूल व पोलिस प्रशासन कामाला लागत आहे. यांच्या बेपर्वाईमुळे संपूर्ण गाव सील होत आहे आणि एकासाठी संपूर्ण गाव वेठीस धरले जात आहे. हे अजून किती दिवस चालणार? 

प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी 

अशी स्थिती असताना गावाकडे येणारांनी इनकमिंग पूर्ण थांबवावे. ते थांबणार नसेल तर गावात आल्यावर किमान 14 दिवस क्‍वारंटाइनमध्ये राहण्याची कळ सोसावी. प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेऊन आम्हाला इनकमिंगमुळे होणाऱ्या दहशतीतून मुक्त करावे, अशी मागणी तालुकावासीयांकडून होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com