
संबंधितांचे नेमक्या कोणत्या अर्थपूर्ण बाबीकडे लक्ष असते, याचीही चौकशी व्हायला हवी असेही सेवकांचे मत आहे.
गोडोली (जि. सातारा) : सातारा तालुक्यातील जानेवारी 2016 ते एप्रिल 2019 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वेतन आयोगातील फरक अद्याप मिळालेला नाही. मात्र, सेवेत असणाऱ्यांची बिले वेळेत काढण्यात संबंधित कार्यालयाने तत्परता दाखवली आहे. परंतु, सेवानिवृत्तांनी हेलपाटे घालूनही त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. गेली दोन वर्षे गटशिक्षणाधिकारी मात्र निधीचे कारण सांगत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांत नाराजी पसरली आहे. त्यांनी तातडीने आजपर्यंत थकीत दोन हप्ते न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षकांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली. त्यात एक जानेवारी 2016 पासून सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना नियमाप्रमाणे वेतनातील फरक समान पाच हप्त्यांत देण्याचे निश्चित झाले होते. त्याप्रमाणे सातारा पंचायत समितीने सुमारे 150 सेवानिवृत्त सेवकांचे विकल्प भरून घेतले. त्यात समान हप्त्यांत फरकाची बिले तयार केली. त्यानुसार पहिला हप्ता दोन जून 2019 रोजी, दुसरा हप्ता एक जून 2020 रोजी मिळणार होता. मात्र, आजअखेर एक दमडीही खात्यावर जमा झाली नाही. वास्तविक पाहता सेवानिवृत्तांना आजारपण, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह यांसारख्या गोष्टींना पैशाची गरज असते. सध्या अनेकांच्या खासगी नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. शेतीचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे आर्थिक ओढाताण सुरू आहे. त्यातच वेतन आयोगाच्या फरकाची गरज असतानाही हातात पैसा मिळाला नाही. यासंदर्भाने गटशिक्षणाधिकाऱ्यांना विचारले असता, त्यांनी वरिष्ठांना भेटा असे सांगून मूळ प्रश्नाला बगल दिली. सेवेत असणाऱ्यांना लगेच पैसा दिला जातो. पण, सेवानिवृत्तांची सर्व स्तरावरून हेळसांड चालवली आहे.
शिक्षक संघटनाही मूग गिळून गप्प!
दरम्यान, शिक्षक संघटनाही या बाबतीत मूग गिळून गप्प आहेत. फरकाची रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित सेवकांनी दिला आहे. गेल्या दोन वर्षांत संबंधितांना या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, संबंधितांचे नेमक्या कोणत्या अर्थपूर्ण बाबीकडे लक्ष असते, याचीही चौकशी व्हायला हवी असेही सेवकांचे मत आहे.
केंजळ येथून विनापरवाना दगड खाणीतून गौण खनिज चोरी करणाऱ्या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संपादन - सिद्धार्थ लाटकर