विंधन विहिरींबाबत पाटणवर कायम अन्याय, पाच योजना कागदावर

Satara
Satara
Updated on

पाटण (जि. सातारा) : पाणी टंचाई आराखड्यात पाटण तालुक्‍याला नऊ विंधन विहिरी मंजूर आहेत. त्यापैकी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्याने फक्त तीन विंधन विहिरींची खोदाई झाली असून, पाच योजना कागदावर राहिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडे 11 तालुक्‍यांसाठी फक्त दोन बोअर मारणाऱ्या गाड्या असल्याने पाटणवर कायम अन्यायच होतो. पिण्याच्या पाण्याचे स्वप्न लालफितीत अडकले असल्याने अजून किती वर्षे आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी पायपीठ करायची, असा सवाल टंचाईग्रस्त गावातून होत आहे. 

पाटण तालुका धरणांचा तालुका असे समीकरण असले तरी डोंगर उतार व पठारावरील गावांबरोबर सखल भागातील काही गावांत आजही उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. दोन ऑक्‍टोबरच्या ग्रामसभेत संभाव्य पाणी टंचाईचे व त्यावर करण्यात येणाऱ्या उपायांचे ठराव होतात. पुन्हा 26 जानेवारीच्या ग्रामसभेत शिक्कामोर्तब केले जाते. परंपरेप्रमाणे हे ठराव ग्रामपंचायत पंचायत समितीला, पंचायत समिती जिल्हा परिषदेकडे, जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयाला व जिल्हाधिकारी कार्यालय आयुक्तांच्याकडे मंजुरीसाठी पाठवितात. विभागाचा व्याप सांभाळून आयुक्त त्यास अंतिम मान्यता देतात. मान्यता मिळायला एप्रिल व अंमलबजावणीस 
मे उजाडतो. तोपर्यंत पावासाळा सुरू होतो आणि शासकीय यंत्रणे प्रमाणे गावकरीही टंचाई विसरून जातात. 

पाणी टंचाई आराखड्यातील नवीन नळपाणी पुरवठा योजना, विहिर खोल करणे, गाळ काढणे किंवा आडवे बोअर घेणे व तात्पुरत्या नळपाणीपुरवठा योजना करणे ही कामे होतात. मात्र, विंधन विहिरींचा प्रश्न प्रलंबित असल्याने प्रत्येकवर्षी तीच गावे आराखड्यात पाहावयास मिळतात. त्याचे कारणही तसेच आहे. विंधन विहिर मारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडे 11 तालुक्‍यांसाठी फक्त दोन गाड्या आहेत. पाटणसारख्या दुर्गम भागाच्या वाटणीला या गाड्या येत नाहीत. दुष्काळी भागातच त्यांचा वर्षभर वावर असतो. 

यावर्षीच्या आराखड्यात एकूण नऊ योजना मंजूर आहेत. त्यापैकी बौद्धवस्ती व कारंडेवस्ती पाणेरी आणि घाटेवाडी मालोशी या तीन विंधन विहिरींची खोदाई खासगी मशीनद्वारे ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आली आहे. मात्र, तामिणे खालचे आवाड, बौद्धवस्ती तामिणे, सातरच्या लाखनवस्ती, सुतारवस्ती व झोरेवस्ती सह जोगेटेक (गावडेवाडी) या सहा विंधन विहिरी पावसाळा सुरू झाल्यामुळे अपूर्ण राहिल्या आहेत. गतवर्षी 18 विंधन विहिरी घेण्याबाबत प्रस्ताव पाठविले होते. त्यापैकी सहा पूर्ण झाल्या; परंतु इतर मंजूर नऊ असतानाही त्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाल्या नाहीत. 

यावर्षीही जिल्हा परिषदेच्या गाड्यांनी पाठ फिरविल्याने ही गावे पुन्हा टंचाईच्या यादीत गेली आहेत. वेळेत बोअर मारणारी गाडी येत नाही, 
खासगी परवडत नाही आणि पावसाळा सुरू झाला की दुर्गम भागातील कच्च्या रस्त्यांवरून गाडी गावात जात नाही. या सातत्याने होणाऱ्या प्रकारामुळे विंधन विहिरीचे जनतेचे स्वप्न दिवास्वप्न राहते आणि प्रत्येक वर्षी फक्त ठराव करण्याचे दिव्य या गावांना करावे लागते, ते कधी थांबणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

""जिल्हा परिषदेच्या बोअर मारणाऱ्या गाड्या दुष्काळी भागात जातात. यावर्षी अपूर्ण राहिलेल्या विंधन विहिरी दुष्काळी तालुक्‍यांत टंचाई निर्माण होण्याअगोदर पाटण, जावळी व महाबळेश्वर या दुर्गम तालुक्‍यांना देणे गरजेचे आहे. याबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या मासिक सभेत वस्तुस्थिती जिल्हा प्रशासनाला दाखविली आहे.'' 

-राजाभाऊ शेलार, 
सभापती, पंचायत समिती, पाटण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com