
फलटण : ज्वारीची काकवी बनवेल शेतकऱ्यांना उद्योजक
फलटण : वातावरणात होणाऱ्या बदलाचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतीला पूरक व्यवसाय आवश्यक बनला आहे. त्यासाठी येथील निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटने (नारी) गोड ताटाच्या ज्वारीपासून काकवी बनविण्याचा लघु उद्योग शेतकऱ्यांसाठी विकसित केला आहे. या उद्योगामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायद्याबरोबर लघुउद्योजक होण्याची संधीही ''नारी''ने उपलब्ध केली आहे.
शेतकऱ्याने पारंपरिक शेतीच्या चक्रामध्ये न अडकता शेतीत घेत असलेल्या पिकांवर प्रक्रिया करण्याचा म्हणजेच अन्नप्रक्रिया लघुउद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून येथील निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटने (नारी) शेतकऱ्यांसाठी या कार्यक्षम अन्नप्रक्रिया यंत्रणेची निर्मिती केली आहे. या प्रकल्पास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने निधीही दिला आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुप्पट, तिप्पट वाढ व्हावी, हे या उद्योगाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे.
गोड ज्वारीच्या ताटापासून काकवी बनविण्यासाठी नारीने मधुरा-३ ही खास ज्वारीची जात विकसित केली आहे. एकट्याने किंवा दोन ते तीन जणांमध्येही हा उद्योग केला जाऊ शकतो. या उद्योगात कमी मनुष्यबळाबरोबरच सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. यात पर्यावरणास अनुकूल भट्टी असून त्यात पाला-पाचोळा, लाकडे व चिपाडे, पिकाच्या कुठल्याही अवशेषांचा इंधन म्हणून वापर केला जाऊ शकतो. तसेच क्रशर, फिल्टर, सेटलिंग टँक, कढईतील रस वाहून नेणारी यंत्रणा आदींचा यामध्ये समावेश आहे. यासाठी वीजही कमी लागते.
‘नारी’मध्ये गेली तीस वर्षे काकवी तयार केली जात असून काळानुरुप त्यात बदल करण्यात आला. तेथे तयार होणारी काकवी चवदार, दर्जेदार व टिकाऊ बनली असून ती उत्कृष्ट प्रतीची मानली जाते. गेल्या पाच वर्षांत ‘नारी’ने तब्बल सहा टन काकवीचे उत्पादन घेऊन तिची विविध कंपन्यांना संशोधनासाठी विक्री केली आहे. याशिवाय विविध कच्च्या कृषी मालापासून काकवी, जॅम, सॉस, केचअप असे अन्य उत्पादन घेण्यासही या यंत्रणेचा सहज वापर केला जाऊ शकतो. आर्थिक सक्षमीकरणाच्यादृष्टीने फायदेशीर असणारा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना ‘नारी’च्या वतीने मार्गदर्शनही केले जाणार आहे.
Web Title: Phaltan Sorghum Molasses Farmers Entrepreneurs
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..