
गोंदवले - स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विधवा प्रथाबंदी करून पिंपरीकरांनी विधवांना सामाजिक जोखडातून मुक्त केले आहे. विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून विधवा प्रथाबंदीची प्रत्यक्षात कार्यवाही करणारे पिंपरी हे माणमधील चौथे गाव आहे.
सामाजिक बांधिलकी राखण्याबाबत अनेक उपक्रम राबविणाऱ्या पिंपरीत विधवा प्रथा बंद करून विधवांना समाजात मानाचे स्थान देण्यासाठी गावकरी एकवटले होते.या लोकमानसिकतेला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्त स्वरूप मिळून यश आले आहे.शनिवारी (ता. १३) सरपंच सौ.कोमल शिरीष राजगे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.यामध्ये माजी सरपंच चंद्रकांत शिलावंत यांनी विधवा प्रथाबंदी करण्याबाबतची माहिती देऊन चर्चेला सुरुवात केली.यावेळी माजी सभापती नितीन राजगे व दिगंबर राजगे यांनीही परखड मते मांडली. त्यानंतर मांडण्यात आलेल्या विधवा प्रथाबंदीच्या ठरावाला उपस्थितांनी हात उंचावून संमती दर्शवली.
ठराव संमत होताच रुपाली सुळे व अलका पुकळे यांना प्रातिनिधिक स्वरूपात सरपंच कोमल राजगे यांनी हिरवा चुडा भरून हळदी कुंकू लावले. या भावनिक सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गुलाब राजगे, दादासो राजगे, सुजाता राजगे, राणी अवघडे, लक्ष्मी बुधावले, मंगल माने, उज्वला माने यांच्यासह डॉ. एल. बी. राजगे, पोलीस पाटील कैलास राजगे, भीमराव राजगे, उमेदच्या स्वाती अहिवळे, किरण माने, आकराम राजगे, सुरेश राजगे, शहाजी अवघडे, रामभाऊ राजगे, वैभव शिंदे, ग्रामसेवक सचिन सकट, अविनाश शिंदे, सुरजकुमार निकाळजे, अंगणवाडी सेविका, आशासेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजात विधवांबाबत होणाऱ्या दुजाभावाची चीड होतीच.उमेदच्या स्वाती अहिवळे,महिला व ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही पिंपरीत विधवा प्रथा बंद करू शकलो याचा अभिमान आहे.
- कोमल राजगे, सरपंच, पिंपरी (ता. माण).