'एलसीबी'च्या धडाकेबाज छाप्याने 'सेटलमेंट' उघडकीस; पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!

'एलसीबी'च्या धडाकेबाज छाप्याने 'सेटलमेंट' उघडकीस; पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!

कऱ्हाड (जि. सातारा) : राष्ट्रीय महामार्गावर वाढणारी रिव्हॉल्व्हर, गुटखा तस्करीत स्थानिक पोलिसांना तपासात अपयश आले आहे. त्यामुळे गुटखा, पिस्तूल बाळगणाऱ्यांना अटक करण्यासाठी साताऱ्याहून "एलसीबी'ला यावे लागते आहे. "एलसीबी' कारवाई करत असून तळबीड पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकत आहे. तळबीड परिसरात अवैध धंदे वाढत असताना त्यावर पोलिसांचा अकुंश राहिलेला नाही. कारवाईऐवजी होणारी पोलिसांची "सेटलमेंट' महागात ठरत आहे. 

अलीकडे घडलेल्या गुन्ह्यात अवघ्या तिशीतील युवकांचा सहभाग जास्त आहे. त्या नवख्याचे पोलिसांकडे रेकॉर्ड नसते. त्यामुळे गुन्हेगाराची माहिती काढताना पोलिसांची दमछाक होते. पिस्तूल तस्करी करणारे वाढले आहेत. त्यातच गुटख्याची तस्करीही फॉर्मात आहे. तासवडेसारख्या कंपन्यांच्या भागात रिव्हॉल्व्हर तस्करी, गुटखा तस्करीही सुरू आहे. तळबीड पोलिसांना त्याची माहितीच नसल्याने त्यावर सातारा पोलिसांना कारवाई करावी लागते. त्यामुळे तळबीड पोलिस करतात तरी काय, हाच खरा प्रश्न आहे. साताऱ्याच्या "एलसीबी'च्या धडाकेबाज कारवायांची सध्या चर्चा सुरू आहे. तळबीड पोलिसांकडून मात्र कारवाई होत नसल्याने त्याची वेगळीच चर्चा सुरू आहे. 

तळबीड पोलिसांचे कार्यक्षेत्र अवघ्या 12 गावांचे आहे. त्यात एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्गासारखे संवदेनशील ठिकाण त्या पोलिसांच्या हद्दीत येते. तासवडे टोलनाका हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तासवडे औद्योगिक वसाहतीचे कार्यक्षेत्र महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात जुजबी कारवाई वगळता मोठी कारवाई झालेली नाही. या हद्दीत कारवाई होते ती 'एलसीबी'कडून. त्यामुळे तळबीड पोलिस गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात साफ अपयशी ठरले आहेत. 

कारवाईपेक्षा सेटलमेंटच जास्त : तळबीड पोलिसांच्या हद्दीत तासवडे, शिरवडे, यशवंतनगर, घोणशी, वनवासमाची, बेलवडे हवेली, तळबीड, वडोली भिकेश्वर आदी गावांचा समावेश आहे. तेथे अवैध व्यवसाय तोंड वर काढत आहेत. त्यावर कारवाई करण्याएवेजी तेथे "सेटलमेंट'च होत असल्याची चर्चा आहे. जुजबी कारवाई करून पाठ थोपटून घेणाऱ्या पोलिसांना रिव्हॉल्व्हर, गुटखा, फरारी आरोपी का सापडत नाहीत, हाच खरा प्रश्न आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com