मंत्रालयातील निलंबित अव्वल सचिव खाताेय कोठडीची हवा

जालिंदर सत्रे
Wednesday, 20 January 2021

फरारी झालेला संशयित गेली नऊ महिने पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला सातारा येथील निवासस्थानातून पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले.

पाटण (जि. सातारा) : पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी देणारा व गुन्हा नोंद झाल्यानंतर गेली नऊ महिने फरारी असणाऱ्या दिवशी बुद्रुक (ता. पाटण) येथील रहिवाशी व मंत्रालयातील ग्रामविकास विभागाचा निलंबित अव्वल सचिव भरत पाटील याला पोलिसांनी शनिवारी सातारा येथे सापळा रचून ताब्यात घेतले होते. त्याला 17 जानेवारी रोजी न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी (ता.19) त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 12 जानेवारी 2020 रोजी दिवशी बुद्रुक गावात निलंबित अव्वल सचिव भरत आत्माराम पाटील याने तीन मित्रांच्या साहाय्याने शेतीच्या कारणावरून त्याच गावातील पांडुरंग विठ्ठल सूर्यवंशी व सदाशिव महादेव सूर्यवंशी यांना मारहाण केली होती. त्याच वेळी रिव्हॉल्वरचा धाक धाकवून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

​याबाबत त्याचदिवशी भरत पाटील याच्या विरोधात पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर भरत पाटील फरारी झाला होता. मात्र, त्याचे मारूल हवेली येथील निवास्थानातून 12 एमएमचे रिव्हॉल्व्हर व 16 काडतुसे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या पथकाने जप्त केली होती. फरारी झालेला संशयित गेली नऊ महिने पोलिसांना गुंगारा देत होता; परंतु 16 जानेवारी रोजी त्याच्या सातारा येथील निवासस्थानातून पाटण पोलिसांनी भरत पाटील याला ताब्यात घेतले होते. 17 जानेवारीला पाटण येथील न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती. मंगळवारी (ता.19) पोलिस कोठडीची मुदत सपल्यानंतर पुन्हा पोलिसांनी भरत पाटील यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे करीत आहेत. 

कुराण ग्रंथ शिकवणाऱ्या खुर्रमने जिंकली वाघेरीवासियांची मने; रस्त्यात सापडलेली रक्कम केली परत

विजयाचा जल्लाेष पडला महागात; भाऊंना चढावी लागली पाेलिस ठाण्याची पायरी

पिलीव घाटात सातारा-पंढरपूर बसवर दगडफेक; दरोड्याच्या अफवेने सातारा-सोलापूर पोलिसांची पळापळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Bharat Patil Satara Crime News