खंडणी प्रकरणातील वनपालास अटक; वनसंरक्षकांचा पोलिसांना गुंगारा

सुनील शेडगे
Tuesday, 27 October 2020

या खंडणी प्रकरणातील अन्य दोन वनसंरक्षक रणजित व्यंकटराव काकडे व किशोर ज्ञानदेव ढाणे हे पोलिसांना गुंगारा देत आहेत.

नागठाणे (जि. सातारा) : शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पिरेवाडी (ता. सातारा) येथील युवकाकडून खंडणी उकळणाऱ्या मुख्य सूत्रधारास बोरगाव पोलिसांनी अटक केली. योगेश पुनाजी गावित असे त्याचे नाव आहे. गावित हा वनविभागात वनपाल म्हणून कार्यरत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक झाली आहे.
 
त्यातील वनसंरक्षक महेश सोनावले हा सध्या पोलिस कोठडीत आहे. अद्यापि, दोन वनसंरक्षक पोलिसांना गुंगारा देत आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी गेलेल्या पिरेवाडी येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी शिकारीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून 25 हजार रुपये उकळले होते. ही घटना 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. याची तक्रार ओंकार शिंदे याने पाच सप्टेंबरमध्ये बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी वनपाल योगेश पुनाजी गावित, वनसंरक्षक महेश साहेबराव सोनवले, रणजित व्यंकटराव काकडे, किशोर ज्ञानदेव ढाणे या चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून हे चौघेही पोलिसांना गुंगारा देत होते.

लाचप्रकरणी सार्वजनिक बांधकामच्या कर्मचाऱ्याला अटक
 
यापैकी वनसंरक्षक महेश सोनावले याला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. सोमवारी सायंकाळी पोलिसांनी या गुन्ह्यातील प्रमुख वनपाल योगेश गावित याला ताब्यात घेतले. या खंडणी प्रकरणातील अन्य दोन वनसंरक्षक रणजित व्यंकटराव काकडे व किशोर ज्ञानदेव ढाणे हे पोलिसांना गुंगारा देत आहेत. दरम्यान, महेश सोनावलेच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्याला आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

खंडणी प्रकरणात वन विभागातील आणखी दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग! 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Forest Department Workers Satara News

Tags
टॉपिकस
Topic Tags: