पाच महिन्यांत दुप्पट पैसे करुन देताे म्हणणारा खाताेय पोलिस कोठडीची हवा

रमेश धायगुडे
Monday, 15 February 2021

सातारा जिल्ह्यातील लोणंद, वाठार स्टेशन, कोरेगाव, सातारा, म्हसवड, तर सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, अकलूज, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, बागलकोट (कर्नाटक) येथील फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे.

लोणंद (जि. सातारा) : लोणंद पोलिसांनी सापळा रचून सुखेड (ता. खंडाळा) येथे अटक केलेल्या रॉयल वेज मार्केटिंग बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे यास नुकतेच सातारा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

येथील रॉयल वेज मार्केटिंग बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अध्यक्ष विठ्ठल अंकुश कोळपे व त्यांचे अन्य साथीदार या कंपनीच्या माध्यमातून जमीन, तसेच पैशाची पाच महिन्यांत दामदुप्पट करून देतो, म्हणून 28 ते 30 एजंन्टमार्फत सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, नगर, बागलकोट (कर्नाटक) आदी जिल्ह्यातील महिलांचे बचत गट व प्रत्यक्ष खातेदारांशी व्यक्तिगत संबंध प्रस्तापित करून 50 हजार रुपयांपासून 12 लाख रुपयांपर्यंत रक्कम गोळा करून खोटे सांगून कोट्यवधी रुपयांची माया जमवून फसवणूक करत गंडा घालत होते. याबाबत सातारा येथील सूर्यवंशी कॉलनी करंजेतर्फे सातारा येथे राहणाऱ्या सीमा सुनील धनावडे (वय 36) यांनी 27 जानेवारी 2021 रोजी रॉयल वेज मार्केटिंग बिजनेस प्रा. लिमिटेडचे अध्यक्ष विठ्ठल कोळपे, अनिल अंकुश कोळपे (रा. कुसूर, ता. फलटण) व उपाध्यक्ष संदीप सोपान येळे, (रा. पारोडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

अन्य ठिकाणीही त्यांच्याविरुद्ध असे गुन्हे दाखल आहेत. मात्र, विठ्ठल कोळपे फरारी होऊन पोलिसांच्या हाती लागत नव्हता. मात्र, सुखेड (ता. खंडाळा) येथे आपल्या बहिणीकडे येणार असल्याची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांना मिळताच श्री. चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सुखेड येथे जाऊन सापळा रचून विठ्ठल कोळपे यांस अटक केली. दरम्यान, त्यास नुकतेच सातारा येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यास सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी अधिक तपास करत आहेत.

फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी 

सातारा जिल्ह्यातील लोणंद, वाठार स्टेशन, कोरेगाव, सातारा, म्हसवड, तर सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, अकलूज, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, बागलकोट (कर्नाटक) येथील फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे.

कांद्याने व्यावसायिकाच्या डाेळ्यात आणले पाणी; दहा लाखांना फटका

तीन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूचे गुढ उकलणार !

वाचनप्रेमींनाे! साताऱ्यात ग्रंथोत्सव; सवलतीच्या दरात नामवंत लेखकांच्या पुस्तकांचा खजाना

CoronaUpdate : वाढती रुग्णसंख्या राेखण्यासाठी आठवडा बाजार रद्द; प्रांताधिकाऱ्यांचे उपायाचे निर्देश

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested MD Vitthal Kolpe Royal Marketting Business Private Ltd Satara Crime News