‘खाकी’तही वाहतेय निवडणुकीचे वारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Credit Co-operative Society Election two panel merge satara

‘खाकी’तही वाहतेय निवडणुकीचे वारे

सातारा : जिल्‍हा पोलिस दलातील कर्मचाऱ्यांची अर्थवाहिनी असणाऱ्या पोलिस क्रेडिट को ऑपरेटिव्‍ह सोसायटीच्‍या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली आहे. यातील विजयाचे प्रमुख दावेदार समजल्या जाणाऱ्या दोन पॅनेलचे मनोमिलन झाले आहे. तिरंगी होऊ घातलेली ही निवडणूक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आता दुरंगी होणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकलेल्या परिवर्तन व सहकार पॅनेलने सहकार- परिवर्तन नावाने लढत देण्याचे निश्चित केल्याने सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

सहकार कायद्यातील घटना दुरुस्तीमुळे सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा पोलिस क्रेडिट सोसायटीची निवडणूक लागली होती. सहकारातील निवडणुकीच्या प्रकाराला पोलिस नवखे होते. त्यामुळे पहिल्या निवडणुकीत केवळ प्रगती या नावाने एकच पॅनेल उभे राहिले, तरीही अपक्ष म्हणून कांतिलाल नवघणे यांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदान झाले. पॅनेल विरुद्ध एकमेव उमेदवार अशी लढत होऊनही नवघणे यांचा अवघ्या एक मताने पराभव झाला. त्याच वेळी पुढील निवडणुकीत दुसरे पॅनेल पडून चुरस वाढणार हे स्पष्ट झाले होते. ते आता प्रत्यक्षात येत आहे.

‘प्रगती’चे नेतृत्व ज्योतिराम बर्गेंकडे

सोसायटीच्या पहिल्या निवडणुकीत शेखर कडव यांच्या नेतृत्वाखाली प्रगती पॅनेलने सत्ता मिळवली होती. सात वर्ष ते अध्यक्ष राहिले. या निवडणुकीतही ते उमेदवार असण्याची शक्यता आहे; परंतु प्रगती पॅनेल उपनिरीक्षक ज्योतिराम बर्गे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची व्यूहरचना आहे. विरोधकांचे आव्हान परतविण्यासाठी त्यांनीही नव्या व जुन्या उमेदवारांचा मोट बांधण्याचे काम सुरू आहे. येणाऱ्या आव्हानाला ते कसे तोंड देतात, यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.

Web Title: Police Credit Co Operative Society Election Two Panel Merge Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..