Video : सातारकरांनाे घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा; अन्यथा तुमच्यावरही हाेऊ शकते कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

स्वत:च्या व शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातारकरांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन विठ्ठल शेलार (सहायक पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा) यांनी केले आहे.

सातारा : कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी वाहतुकीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. शहर पोलिसांनी तीन दिवसांत तब्बल साडेतीन हजार वाहनांवर सुमारे दहा लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये बहुतांश कारवाया या डबलशिट वाहतुकीच्या असल्याने सातारकरांनी घराबाहेर पडताना नियमांचे पालन करतोय का, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. 

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 22 मार्चपासून जिल्ह्यामध्ये लॉकाडाउन जाहीर करण्यात आले होते. या वेळी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व प्रकाराच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी होती. तीन लॉकडाउननंतर शासनाने अटींमध्ये शिथिलता आणली. त्यामध्ये नागरिकांना जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी देण्यात आली. ही परवानगी देताना जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीवर केवळ एकाला, चार व तीन चाकी वाहनांमध्ये चालक व दोन प्रवासी अशा तिघांनाच प्रवास करण्याला परवानगी देण्यात आली होती. तसेच प्रत्येकाला तोंडाला मास्क लावणेही बंधनकारक करण्यात आले होते. 

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लोकांनी कामावर जाणे, उद्योग व व्यवसायासाठी बाहेर पडणे आवश्‍यक होते. त्यासाठी वाहनांच्या वाहतुकीस परवानगी देण्यात आली. लॉकाडाउनमुळे कोरोनाचे गांभीर्य लक्षात आले असेल, अशी धारणा प्रशासनाची होती. त्यामुळे लोक दिलेल्या नियमांचे पालन करतील, अशीही अपेक्षा होती. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यामध्ये नागरिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नव्हती. प्रशासन शांत आहे म्हटल्यावर नागरिकांनी नियमांच्या पालनाला तिलांजली दिली. त्यामुळे दुचाकीवरून सर्रास दोघे व चारचाकी वाहनातून दोनपेक्षा जास्त लोकांची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे सहाजिकच रस्त्यावर तसेच बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण वाढले होते.
 
नागरिक नियम पाळत नसल्यामुळे एकीकडे गर्दी वाढत होती. त्याचबरोबर गेल्या आठ दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढत्या गर्दीने कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसांपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. त्यासाठी शहरातील पोवई नाका, कासट मार्केट, जुने आरटीओ कार्यालय, मोती चौक, चांदणी चौक, कमानी हौद, गोडोली नाका, अजंठा चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, जिल्हा परिषद चौक, वाढे फाटा अशा शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या पथकांकडून प्रामुख्याने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्‍यक असलेले नियम मोडणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये डबलशिट गाडी चालविणारे, मास्क नसणारे, चारचाकीमध्ये दोन प्रवाशांपेक्षा जास्त संख्या असणे, विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. रस्त्यावर हुज्जत टाळण्यासाठी संबंधित वाहनचालक व गाडीचा फोटो काढून थेट ई-चलन केले जात आहे. दंडात्मक कावाईचा मेसेज आल्यावर वाहनचालकाला आपल्यावर कारवाई झाल्याचे समजत आहे. तीन दिवसांमध्ये अशा प्रकारे तब्बल साडेतीन हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल दहा लाख रुपये दंडाची ही कारवाई झाली आहे. त्यातून सातारकरांनी नियम कसे धाब्यावर बसविले आहेत, हे समोर येत आहे.

तारळीचं पाणी आलं, टेंभूचं कधी येणार? 

पाटणमध्ये भातासह नाचणीची पुनर्लागण 

""स्वत:च्या व शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातारकरांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे.'' 

-विठ्ठल शेलार, सहायक पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Fine Citizens Who Breaks Rules In Satara City