जमिनीचा वाद मिटविण्यासाठी आईला दिले पेटवून; फिर्यादी सूनच बनली संशयित आराेपी

जमिनीचा वाद मिटविण्यासाठी आईला दिले पेटवून; फिर्यादी सूनच बनली संशयित आराेपी

सातारा : पिंप्रद (ता. फलटण) येथे वृद्धेचा खून करून झोपडी जाळल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला. त्यामध्ये जमिनीच्या वादातील दुसऱ्यांवर आरोप करण्यासाठी मुलगा व सुनेसह अन्य नातेवाईकांनीच कट रचून वृद्ध सावत्र आईचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे खुनाची फिर्याद देणारी सूनच या गुन्ह्यात संशयित बनली आहे.
 
या प्रकरणी अगोदर अटक केलेल्या संशयिताचा अहवाल न्यायालयाला पाठवल्यानंतर त्यांची सुटका होणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कल्पना अशोक पवार (यापूर्वीची फिर्यादी), अशोक झबझब पवार, कमांडो ऊर्फ किमाम अशॅक पवार, गोपी अशोक पवार, विशाल अशोक पवार, रोशनी रासोट्या काळे, काजल ऊर्फ नेकनूर पोपट पवार, मातोश्री ज्ञानेश्‍वर पवार (सर्व रा. अलगुडेवाडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. श्री. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंप्रदच्या हद्दीत झबझब पवार याने 20 गुंठे जमीन खरेदी केली होती. परंतु, त्यावर या जमिनीतील सामाईक हिस्सेदारांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून पवार व गावातील भगत व मोरे यांच्याशी वाद होता. त्यावरून त्यांच्यात सतत भांडणे होत होती. त्यामुळे झबझब पवारचा मुलगा, सून व अन्य नातेवाईकांनी महुली झबझब पवार या वृद्धेचा खून करून त्याचा आळ भगत व मोरे कुटुंबीयांवर टाकण्याचा कट रचला. खुनाच्या गुन्ह्यात ते आत गेल्यावर जमीन कसायला आपण मोकळे होऊ असे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी बुधवारी (ता. 10) वृद्धेच्या डोक्‍यात दगड घालून तिला गंभीर जखमी केले. ती बेशुद्ध असतानाच त्यांनी ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून तिला पेटवून दिले.

या प्रकरणी कल्पना पवार हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कुंडलिक कृष्णा भगत, सतीश उत्तम भगत, राजू प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनील मोरे (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. पिंप्रद) यांना अटक केली होती. तपासादरम्यान पोलिसांना फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आढळली. त्यामुळे तपासाची दिशा बदलली. अधिक चौकशीत घटनेनंतर पवार कुटुंबातील दोघे पसार झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी महुली यांच्या खुनाचा उलगडा झाला. त्यानंतर फिर्यादीसह अन्य संशयितांना अटक करण्यात आली.

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार जोतिराम बर्गे, उत्तम दबडे, हवालदार तानजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, रवी वाघमारे, नीलेश काटकर, प्रमोद सावंत, अर्जुन शिरतोडे, गणेश कापरे, अमित सपकाळ, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, संकेत निकम, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन, प्रवीण अहिरे, महेश पवार, अनिकेत जाधव, संजय जाधव, पंकज बेसके, गणेश कचरे, विजय सावंत यांनी ही कारवाई केली. 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com