लोकवस्तीतील पोलिस चौक्या पडल्या ओस | Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police

लोकवस्तीतील पोलिस चौक्या पडल्या ओस

कऱ्हाड : शहरासह तालुक्यात वाढलेला क्राईम रेट, खून, खुनी हल्ल्यांसारख्या वाढत्या घटना लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांची सतर्कता वाढविण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, शहरासह तालुक्यात नेमका उलटा प्रकार होताना दिसतो आहे. खून, मारामाऱ्यांसारखे प्रकार होतानाच गजबजलेल्या लोकवस्तीत पोलिस चौक्यांसह पोलिसांची उपस्थिती घटताना दिसते आहे. गस्त घालणारे पोलिसही सुस्त झाल्याने खुनासहित दंगा, मारामाऱ्यांसारखे प्रकार वाढताना दिसताहेत. ती स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस चौक्यांची संकल्पना जरी अमलात आणण्याचा प्रयत्न झाला, तरी केवळ चारच पोलिस चौक्या शिल्लक आहेत. बाकी कर्मचाऱ्यांअभावी ओस आहेत. बीट मार्शल म्हणून गस्त घालणाऱ्या पोलिसांची संकल्पनाही अधिक ताकदीने येथे राबवली जात नसल्याने मोठ्या कठीण स्थितीशी सामना करावा लागतो आहे.

हेही वाचा: Ajit Pawar: पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने; अजित पवार,पाहा Video

शहराची लोकसंख्या व त्यासाठी असलेला पोलिस संख्या पाहता विदारक स्थिती आहे. मात्र, त्यातूनही पोलिस अनेकदा विविध उपक्रमांद्वारे क्राइमवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यासाठी शहरात यापूर्वी दहा पोलिस चौक्या होत्या. मात्र, त्या चौकींच्या कारभाराच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यातील सहा पोलिस चौक्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे सध्या शहरात केवळ चार पोलिस चौक्या आहेत. त्यात मेनरोड, चावडी चौक, कार्वे नाका, भाजी मंडई या पोलिस चौक्यांचा त्यात समावेश आहे. त्या चारही पोलिस चौक्या भर लोकवस्तीत आहेत. मात्र, त्या अनेकदा ओस पडलेल्या दिसतात. पोलिस चौक्यांना कुलूप असते. अनेकदा चौकी उघडी असली, तरी पोलिस गायब असतात. पोलिस चौक्यांना पर्याय म्हणून बीट मार्शल गस्त सुरू झाले. मात्र, ते पट्रोलिंगही अत्यंत त्रोटक आहे.

हेही वाचा: रुग्ण वाढल्यास पुन्हा कठोर निर्णय घेणार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

पोलिस चौक्या ओस पडू लागल्याने व बीट मार्शलिंगही कमी ताकदीने होत असल्याने शहरात मागील आठवड्यात खून, मारामाऱ्यांचे सत्र सुरू होते. आजही शहरातील काही भागांत तणाव असतो. गजबजलेल्या लोक वस्तीतील ओस पडणाऱ्या पोलिस चौक्याही त्याला कारणीभूत आहेत. भाजी मंडई, बारा डबरी परिसरात झालेल्या खुनाच्या घटना तेथे अत्यंत नगण्य आहेत. त्यात अल्पवयीन मुलांचा समावेश होता. मात्र, त्या घटना हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस चौकीत पोलिस असते, तर कदाचित त्या टळल्या असत्या. बारा डबरी परिसरात बीट मार्शलिंगचे पोलिस वेळेत पोचले असते, तर खुनाचा अनर्थ टळला असता. रात्री दहाच्या सुमारास भाजी मंडई चौकीतील पोलिसांनी गस्त घातली असती तर चौकीपासूनच्या हाकेच्या अंतरावरील खुनाची घटना टाळता आली असती. मेन रोड पोलिस चौकीपासून काही अंतरावरील बाजारपेठेत मारामारी झाली तीही रोखता आली असती.

पोलिसांची संख्याही कमी

शहर पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र २१ गावांसह तर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३९ गावे आहेत. त्या तुलनेत पोलिसांची संख्या विरोधाभास दाखवणारी आहे. शहरासह गावांचा ताण दुप्पट तर पोलिसांची संख्या अगदीच अपुरी आहे. शहरात यापूर्वी दहा पोलिस चौक्या होत्या. त्यातील सहा चौक्या बंद आहेत. त्याऐवजी दुचाकावीरून दोन पोलिस रोज दिवसाही गस्त घालतात. त्याला बीट मार्शलिंग म्हणतात. तेही शहरात अपुरे आहेत. तालुक्यातही काही वेगळी स्थिती नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sataracrime
loading image
go to top