मनाशी खूणगाठ बांधली अन् कोरोनाला धैर्याने तोंड दिले : पोलिस पाटील प्रशांत कोळी

संजय जगताप
Thursday, 24 September 2020

'होम आयसोलेशन'चा पर्याय असल्याने मी कोरोना केअर सेंटरमध्ये न जाता घरीच टेरेसवरील स्वतंत्र खोलीत आयसोलेट झालो. ताप व कोरडा खोकला वाढल्यामुळे येथील मेडिकल कॉलेजच्या कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल झालो. डॉक्‍टरांनी ऑक्‍सिजन लेवल व पल्स रेटसह अत्यावश्‍यक तपासणी केली. छातीचा एक्‍स-रे घेतला. त्यानुसार डॉ. सागर खाडे यांनी उपचाराला सुरुवात केली, असे पोलिस पाटील प्रशांत कोळी यांनी सांगितले.

मायणी (जि. सातारा) : येथील पोलिस पाटील प्रशांत कोळी यांनी कोरोनाबाधित झाल्यानंतर भयभीत होऊन काळजी न करता त्यावर मात करण्याची काळजी घेतली. धैर्य, जिद्द व मनोबलाच्या जोरावर त्यांनी कोरोनाचा यशस्वी मुकाबला केला. 

पोलिस पाटीलपदावर काम करताना अनेक लोकांशी थेट व जवळचा संबंध येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन म्हणून पोलिस, आरोग्य व महसूल विभागाने दिलेली जबाबदारी पूर्ण करावी लागत होती. मायणीतील मेडिकल कॉलेजमध्ये सुरू केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये अधूनमधून, घाईगडबडीत जावे लागत होते. अचानक एक दिवस अंग ठणकू लागले. कणकण आली. मात्र, त्याकडे मी दुर्लक्ष केले. दोन दिवसांनी अंग तापाने फणफणले. मग माझ्या मनात थोडीशी पाल चुकचुकली. कोरोनाची शंका आली. मी कोणासही न सांगता स्वतःहून तपासणी करून घेतली. कोरोना तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याबाबत कुटुंबीयांना कल्पना दिली. 

बाळासाहेब म्हणतात, वयाच्या सत्तरीतही मी कोरोनाला गाडून आलो!

"होम आयसोलेशन'चा पर्याय असल्याने मी कोरोना केअर सेंटरमध्ये न जाता घरीच टेरेसवरील स्वतंत्र खोलीत आयसोलेट झालो. ताप व कोरडा खोकला वाढल्यामुळे येथील मेडिकल कॉलेजच्या कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल झालो. डॉक्‍टरांनी ऑक्‍सिजन लेवल व पल्स रेटसह अत्यावश्‍यक तपासणी केली. छातीचा एक्‍स-रे घेतला. त्यानुसार डॉ. सागर खाडे यांनी उपचाराला सुरुवात केली. घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगून त्यांनी मला आधार दिला. तेथील ख्रिस्तीना व प्राजक्ता या परिचारिका दिवसातून दोन-तीन वेळा येऊन ऑक्‍सिजन लेवल व पल्सरेटची तपासणी करीत असत. 

आळंदी-पंढरपूर महामार्ग निर्मितीत भ्रष्टाचार : खासदार रणजितसिंह निंबाळकर

औषधे वेळेवर घेतल्याची विचारपूस करीत असत. हॉस्पिटलच्या मेसमधून जेवण चांगले मिळत असतानाही घरचे जेवण घेण्याचा अट्टाहास कुटुंबीय करीत असत. माझ्या वडिलांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबीय गांगरून गेले. मात्र, धाडसाने सावरून घेत त्यांनी भक्कम आधार दिला. काळजी करू नका, घाबरू नका, आम्ही आहोत ना! तुम्ही बरे होऊन लवकर घरी या. अशी मायेची साद घालण्याने क्षणभर गहिवरून येत असे. मग मनाशी खूणगाठ बांधली. प्राप्त परिस्थितीला धैर्याने तोंड दिले आणि कोरोनावर यशस्वीपणे मात केली. बरे होऊन घरी जाताच कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

सलग दुस-या दिवशी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच

कोरोनाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. "येता कणकण तापाची, करा तपासणी कोरोनाची!' असा मोलाचा सल्ला देत कोळी म्हणाले, "लोकांनी स्वतः कोरोनाची तपासणी करून घ्यावी. बाधित झाल्याचे जेवढ्या लवकर (अर्ली स्टेजला) स्पष्ट होईल, तेवढ्या लवकर योग्य उपचारामुळे रुग्ण झपाट्याने बरा होईल. काळजी करू नका, काळजी घ्या.'' 

-प्रशांत कोळी, पोलिस पाटील, मायणी

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Patil Prashant Koli Expressed Views After Recovery Covid-19 Satara News