सायगाव पोलिस पाटील यांचा प्रामाणिकपणा, साडेचार लाखाचे सोने दिले परत

प्रशांत गुजर     
Tuesday, 6 October 2020

जावळी तालुक्यातील सायगाव येथील प्रवेशद्वारावर साडेचार लाखाचे सोने रस्त्यावर पडले होते. हे सोने उचलून मेढा पोलिस ठाण्यात जमा करून पोलिस पाटील सुहास भोसले यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

सायगाव (सातारा) : आजच्या जगात प्रामाणिकपणा या गोष्टी विरळ होत असतानाही मात्र अजूनही जगात प्रामाणिक लोक आहेत, यांची प्रचिती सायगाव येथे पाहण्यास मिळाली आहे. ती खर्शी तर्फे कुडाळ गावचे पोलिस पाटिल सुहास भोसले यांच्या रूपाने. जावळी तालुक्यातील सायगाव येथील प्रवेशद्वारावर साडेचार लाखाचे सोने रस्त्यावर पडले होते. हे सोने उचलून मेढा पोलिस ठाण्यात जमा करून पोलिस पाटील सुहास भोसले यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
     
याबाबत माहिती अशी की, जावळी तालुक्यातील सायगाव येथे दैनंदिन काम करून खर्शी तर्फ कुडाळ ता.जावळीचे पोलिस पाटील सुहास भोसले हे आपल्या दुचाकी वाहनातून रविवारी रात्री घरी निघाले होते. रस्त्यावर मोटारसायकल हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना सोनेरी वस्तू पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ती वस्तू उचलून थेट मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक निळकंठ राठोड यांना त्वरित याबाबत मोबाईलवर सांगितले. रात्रीची वेळ असल्याने सकाळी सापडलेली सोनेरी वस्तू घेऊन या अशी सूचना केली. त्यानुसार पोलिस पाटील सुहास भोसले यांनी सकाळी मेढा पोलिस ठाणे गाठले. 

मेढा बाजारातील एका सोनाराकडे ती वस्तू पोलिसांना सोबत घेऊन दाखविली. त्यावेळी ते सोन्याचेच दागिने असल्याची खात्री पटल्यानंतर त्याचे वजन केले असता त्याचे वजन आठ तोळे तीन ग्रँम पाचशे मिली एवढे भरले. सदर दागिने सहायक पोलिस निरिक्षक राठोड यांच्याकडे सोपविण्यात आले. सोन्याची खात्री पटवून ते मालकाला देण्यात येणार आहे असे सांगण्यात आले. दरम्यान, सायगाव येथील एका दत्तात्रय ससाने यांच्या आईचे दागिने पडल्याची चर्चा झाली होती, मेढा पोलिसांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर दागिने देण्याची ठरविल्याने दागिने मालकाचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांनी सुहास भोसले यांची भेट घेवून आजही अशी प्रामाणिक माणसें असल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. 
     
यापूर्वी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पोलिस पाटील भोसले यांनी अनेक विधायक उपक्रमात सहभागी होऊन कर्तव्य जपलं आहे. त्यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल आमदार शिवेद्रराजे भोसले, माजी सभापति सुहास गिरी, सहायक पोलिस निरिक्षक निळकंठ राठौड़, तहसीलदार शरद पाटील, बीडीओ सतीश बुद्धे, संदीप किर्वे, अनुकूल चिकाटे, आतिश फरांदे यांच्यासह जावली तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 
मेढाचे सहायक पोलिस निरिक्षक निळकंठ राठौड़ म्हणाले, पोलिस पाटिल सुहास भोसले यांनी आज तब्बल आठ तोळे सोने परत करून खऱ्या अर्थाने आज जगात प्रामाणिकपणा शाबूत असल्याचे दाखवून दिले आहे, त्यांचे मनापासून कौतुक आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Patil from Saigaon deposited Rs 4.5 lakh of gold found on the road at the police station