

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Co-operative Bank Election) सर्वसमावेशक आघाडीचा प्रयोग राष्ट्रवादीकडून (NCP) केला जाणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसला (Congress) या वेळी समावून घेऊन काही जागा मिळणे आवश्यक आहे, अन्यथा कॉंग्रेसही वेगळी भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. येत्या 19 तारखेला कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) याबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेतील सर्वसमावेशक आघाडीत कॉंग्रेसला किती स्थान मिळणार यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत यावेळेस कॉंग्रेस सहभागी होणार आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी आता ठरावांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक इच्छुक व्यक्ती आपापल्या नावांचे विविध मतदारसंघातून ठराव करण्यात व्यस्त आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना जिल्हा बॅंकेची यावेळची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटत आहे; पण ते इतके सोपेही नाही. पक्षविरहित आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांना समावून घेऊन त्यांना योग्य जागा देण्याचेही आव्हान आहे, तसेच मागील वेळी दिलेला शब्द यावेळेस पूर्ण करावा लागणार आहे. या सर्व परिस्थितीत चर्चा फिस्कटल्यास राष्ट्रवादीच्या विरोधात दुसरे पॅनेल टाकण्याचीही शक्यता आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) महत्त्वाचा घटक पक्ष कॉंग्रेस असून, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत या वेळेस कॉंग्रेसनेही उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
याला कारणही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आजपर्यंत कॉंग्रेसला सर्व पातळीवर डावलण्याची घेतलेली भूमिका हे आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कॉंग्रेस आता जिल्हा बॅंकेत आपले अस्तित्व निर्माण करणार आहे. त्यासाठी त्यांना किमान दोन जागा तर द्याव्या लागणार आहेत. यातील एक जागा (कै.) विलासराव पाटील- उंडाळकर यांचे चिरंजीव ऍड. उदयसिंह पाटील यांना यावेळेस सोसायटी मतदारसंघातून बॅंकेवर घेतले जाईल; पण त्यासोबतच राखीव मतदारसंघातून एक जागा तरी द्यावी लागेल. त्यासाठी कॉंग्रेसचे सर्व नेते आग्रही आहेत. यासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईत झालेली आहे. यामध्ये बरेच काही ठरलेले आहे; पण त्याबाबतची नेमकी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येत्या 19 तारखेला साताऱ्यात येऊन मांडणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शिवसेनेसोबतच कॉंग्रेससोबतही अॅडजेस्टमेंट करावी लागेल, तरच जिल्हा बॅंकेची निवडणूक काही अंशी बिनविरोध होणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत यावेळेस कॉंग्रेस सहभागी होणार आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वसमावेशक आघाडीच्या माध्यमातून निवडणूक बिनविरोध करण्याची त्यांची भूमिका दिसते; पण यामध्ये कॉंग्रेसला सामावून घेऊन योग्य स्थान मिळाले, तर ठिक अन्यथा कॉंग्रेसला वेगळा विचार करावा लागेल. लवकरच पृथ्वीराज चव्हाण बॅंकेबाबतची कॉंग्रेसची भूमिका मांडणार आहेत.
-डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, सातारा जिल्हा कॉंग्रेस