सावधान! कुकुडवाड-मायणी मार्ग बनतोय जीवघेणा, संरक्षक कठड्यांचीही दुरवस्था

केराप्पा काळेल
Thursday, 29 October 2020

प्रत्येक वळणावर संरक्षक कठड्याची दुरवस्था झाल्यामुळे, तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ही खिंड अपघाताला निमंत्रित देण्याचे ठिकाण ठरत आहे. रात्रीच्या वेळी संरक्षक कठडे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. प्रत्येक वळणावर कोणतेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवीन वाटसरूंना डोकेदुखी ठरत आहे. या खिंडीत अपघात झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा सवाल जनतेतून निर्माण होत आहे.

कुकुडवाड (जि. सातारा) : कुकुडवाड-मायणी या रस्त्यावर असलेल्या कुकुडवाड (नंदीनगर) येथील घाटात ठिकठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या खिंडीतील वळणावर संरक्षक कठड्यासह रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या साइडपट्ट्या खूप वर्षांपासून खचल्याने रस्ता अरुंद झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे या ठिकाणावरून जाताना वाहनचालकांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खिंडीच्या पायथ्यालगतच्या नंदीनगर ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. 

कुकुडवाड हद्दीतील नंदीनगर येथील मानेवाडीनजीक व कुकुडवाडपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर नंदीनगर येथील खिंड म्हणजेच एक किलोमीटरचा वळणाचा घाट आहे. या घाटात (खिंड) धोकादायक वळणे आहेत. हा घाट माण व खटाव या दोन तालुक्‍यांच्या सीमेवर असून या रस्त्यावरून वाहनांची सतत गर्दी असते. या खिंडीतून विटा, तासगाव, सांगली, कोल्हापूर या भागाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. वाहनचालकांना या खिंडीतून जाताना जीव मुठीत धरून या छोट्याशा घाटातून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी नंदीनगरातील काही घरे घाटाच्या पायथ्याला असून नजीक प्राथमिक शाळा आहे. या खिंडीतील वळणावर संरक्षक कठड्याची पडझड झाली आहे. 

काळजी करुन नका! तुमच्यावर कारवाई हाेणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा व्यावसायिकांना दिलासा 

वळणावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याची कोणतीही उपाययोजना नाही. पावसाचे पाणी वाहिल्याने रस्ता खचत चालला आहे. प्रत्येक वळणावर संरक्षक कठड्याची दुरवस्था झाल्यामुळे तसेच रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ही खिंड अपघाताला निमंत्रित देण्याचे ठिकाण ठरत आहे. रात्रीच्या वेळी संरक्षक कठडे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. प्रत्येक वळणावर कोणतेही दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवीन वाटसरूंना डोकेदुखी ठरत आहे. या खिंडीत अपघात झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? असा सवाल जनतेतून निर्माण होत आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष घालून दुरुस्तीच्या ठोस उपाययोजना करून हा जनहिताचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन जनतेतून होत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor Condition Of Kukudwad Mayani Road Satara News