मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kelghar Ghat

केळघर घाटातून प्रवास करताना वाहन चालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळली

केळघर (सातारा) : मेढा-महाबळेश्वर मार्गावरील (Medha-Mahabaleshwar Road) केळघर घाटात (Kelghar Ghat) रेंगडी हद्दीजवळ दरड कोसळली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी दरड कोसळूनही ती न हटवल्यामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक करावी लागत आहे. मोठ्या वाहनांना मोठ्या कसरतीने आपले वाहन चालवावे लागत आहे. केळघर, महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मेढा- महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. विटा- महाबळेश्वर या राज्यमार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे.

ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे या केळघर घाटातून प्रवास करताना वाहन चालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घाटामध्ये दरडीचा मोठा भाग आज सकाळी रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या वेळी या रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने कोणतीही हानी झाली नाही. केळघर घाटामध्ये रस्ता रुंदीकरण करण्याचे सुरू आहे. मात्र, घाटामध्ये हे काम दर्जेदार होताना दिसत नाही.

हेही वाचा: ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं आरक्षण रद्द

आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही सिमेंटची कामे हाताने केली जात आहेत. रस्त्याचे काम सलगपणे होत नाही. रस्त्याची एक बाजू पूर्ण करणे आवश्‍यक असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी रस्ता उकरून ठेवला आहे. धोक्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सावधान फलक लावले नाहीत. संरक्षण कठडेही पुरेसे नाहीत. त्यासाठी कोठेही सूचना फलकही लावलेले दिसत नाहीत. रस्त्याच्या कडेला असलेल्या मोऱ्यांची कामेही निकृष्ट झाली असून, जागोजागी रस्ता खणून ठेवला आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्यावरून केळघर ते महाबळेश्वर प्रवास करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

loading image
go to top