'एलसीबी'च्या नव्या कारभाऱ्याकडे लक्ष; पोलिस दलात उत्सुकता

'एलसीबी'च्या नव्या कारभाऱ्याकडे लक्ष; पोलिस दलात उत्सुकता

सातारा : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एलसीबी) कारभाऱ्याचे पद विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या महिन्यापासून रिक्त आहे. काल ही आचारसंहिता उठली आहे. त्यामुळे परीक्षेचा रिझल्ट लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांची अवस्था असते तशी जिल्ह्यातील काही पोलिस निरीक्षकांची झाली आहे. निकाल लवकरच लागणार असल्यामुळे यापूर्वी वापरलेली आयुधे पुन्हा परजण्याचे काहींचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

संदीप पाटील यांच्या काळात पद्माकर घनवट यांनी एलसीबीचे कारभारपण पाहिले. त्यांनीही उत्तम प्रकारे या शाखेचे काम करत अनेक गुन्हे उघडकीस आणले. त्यानंतर पंकज देशमुख यांनी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर पद्‌माकर घनवट संदीप पाटील यांच्या पाठोपाठ पुणे ग्रामीणला गेले. पंकज देशमुख यांचा अधीक्षक म्हणून कार्यकाल काही कालावधीचाच राहिला. त्यानंतर तेजस्वी सातपुते यांच्याकडे सातारा पोलिसांची धुरा आली. त्यांच्या काळात सुरवातीला विजय कुंभार यांनी एलसीबीचे काम पाहिले; परंतु काही काळातच त्यांच्याऐवजी सर्जेराव पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला. त्या वेळी ते सोलापूर ग्रामीणमधून साताऱ्यात बदलून आले होते. मागील महिन्यात सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली. त्यांच्या पाठोपाठ सर्जेराव पाटील यांनी सोलापूर ग्रामीणची वाट धरली. तेव्हापासून एलसीबीचे निरीक्षकपद रिक्त आहे. 

अजयुकमार बन्सल यांनी पोलिस अधीक्षकपद स्वीकारल्यानंतर सर्जेराव पाटील सोलापूरला गेले. जिल्ह्यातील महत्त्वाचे असे हे पद मिळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले. अनेकांच्या माध्यमातून नेत्यांकडे शब्द टाकण्याची गळ घातली जात होती. त्याच पद्धतीने एलसीबीच्या कारभारपणासाठी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरून फिल्डिंग लागली होती. पूर्वीच्या कामाचे दाखले, ज्येष्ठता, जिल्ह्यातील अनुभव अशा विविध परिमाणांची कसोटी त्यासाठी लावली जात आहे. आपलाच माणूस असावा, यासाठी जिल्ह्यातील अनेक नेतेही त्यासाठी प्रयत्नशील होते. परंतु, लगेचच विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे एलसीबीच्या निरीक्षकांची निवडही लांबणीवर पडली होती. या निवडणुकीसाठी लागलेल्या आचारसंहितेची मुदतही संपली आहे. त्यामुळे निरीक्षकांच्या नियुक्‍त्यांचा मार्ग मोकळा होणार असून, एलसीबीसाठी इच्छुक असणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. कोणाची निवड होणार, याबाबत पोलिस दलातही चर्चा सुरू झाल्या आहेत. महिन्याभरापूर्वी केलेले प्रयत्न काहींनी पुन्हा सुरू केले आहेत. सोमवारपर्यंत या पदाचा निकाल लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे एलसीबीचा कारभारी कोण होणार, याची उत्सुकता आहे. 

जिल्ह्यातला की बाहेरचा? 

जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाहता या कारभाऱ्याला राजकीय नेत्यांमध्येही योग्य समन्वय साधण्याचे कौशल्य असणे आवश्‍यक आहे. अन्यथा पोलिसांच्या चांगल्या कामगिरीपेक्षा वाईट गोष्टींचाच गाजावाजा जास्त होऊ शकतो. त्यात आता गृहराज्यमंत्रिपदही जिल्ह्यात आहे. त्यामुळे कारवाया व समन्वय अशी तारेवरची कसरत योग्य करू शकण्याची पात्रता असणाऱ्याचाच शोध पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना घ्यावा लागणार आहे. तो जिल्ह्यातील निरीक्षकांपैकी असणार की बाहेरून कोणी येणार, याचीही पोलिसांमध्ये उत्सुकता आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com