esakal | महामार्गावरुन प्रवास करताय, मग सावधान! पुढे धोका आहे.. 
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावरुन प्रवास करताय, मग सावधान! पुढे धोका आहे.. 

प्रत्येक वर्षी पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचणे आणि खड्डे निर्माण होण्याचे सत्र सुरू आहे. निकृष्ट कामाचाच हा परिणाम असून, यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे, तर दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने कधी-कधी जिवावर बेतत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे जाणीपूर्वक दुर्लक्ष होतेय की काय?, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.  

महामार्गावरुन प्रवास करताय, मग सावधान! पुढे धोका आहे.. 

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : पावसाळा सुरू झाला की, महामार्गावर खड्डे पडतात. रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होते. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाला असला, तरी सध्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. भरधाव जाणाऱ्या वाहनांना पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन खड्ड्यात आदळून मोठे नुकसान होत आहे. तसेच महामार्गावरील पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे वाहने पाण्यात अडकून बंद पडण्याचेही प्रकार वाढलेत. महामार्ग प्राधिकरणाने तातडीने खड्डे बुजवावेत, अशी अपेक्षा वाहनचालकांतून होत आहे. 

प्रत्येक वर्षी पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचणे आणि खड्डे निर्माण होण्याचे सत्र सुरू आहे. निकृष्ट कामाचाच हा परिणाम असून, यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे, तर दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने कधी-कधी जिवावर बेतत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे जाणीपूर्वक दुर्लक्ष होतेय की काय?, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

बाप्पांच्या जयघाेषात साताऱ्यात एसटी सुरु ; अशा आहेत गावांच्या फेऱ्या 

सध्या सर्वच ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले आहेत. पावसाचे प्रमाण वाढल्याने महामार्गावर पाणीही साचत आहे. महामार्गाची पावसाळ्यापूर्वी डागडुजी होत नसल्याचा हा परिणाम आहे. महामार्गावर येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कडेने ठिकठिकाणी चेंबर्स काढले आहेत; पण या चेंबरची तोंडे माती व कचऱ्यामुळे बंद झालेली आहेत, त्यामुळे पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. अवजड वाहनांसह हलक्‍या वाहनांचेही या खड्ड्यांमुळे नुकसान होत आहे.
 
मध्यंतरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवून महामार्गाच्या दुरुस्तीबाबत विचारणा केलेली होती. त्यानंतरही प्राधिकरणाने महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम म्हणून सध्या सातारा ते शेंद्रे या परिसरात महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे प्राधिकरणाने तातडीने महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी जिल्ह्यातील वाहनचालकांतून होत आहे. दरम्यान, रस्त्यांची दुर्दशा होण्यास कारणीभूत ठरणा-या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांच्या विरोधात कठोर कारवाईचा बडगा प्रशासन उगारणार का?, हा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.  

शेंद्रे ते सातारा-लिंब खिंडीपर्यंत दुर्दशा 

सध्या शेंद्रे ते सातारा-लिंब खिंडीपर्यंतच्या महामार्गाची मोठी दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. तसेच मार्गावर मोठ-मोठे खड्डे निर्माण झाल्याने यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेकांच्या मनात स्वतःचा जीव गमावण्याची भीती निर्माण झाली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top