तब्बल 14 तासांनंतर म्हसवडचा वीजपुरवठा सुरळीत

सलाउद्दीन चाेपदार
Friday, 16 October 2020

या पावसामुळे शेतीसह पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, केळी, भुईमूग, उडीद, बाजरी यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने परतीचा पाऊस शेतीच्या मुळावर असल्याचे स्पष्ट झाले.

म्हसवड (जि. सातारा) : भागातील नदीच्या पात्राने धोक्‍याची पातळी ओलांडून पात्रालगतच्या शेतशिवारात पुराच्या पाण्याने वेढा दिल्यामुळे पिके पाण्यात बुडून मोठे नुकसान झाले. येथील रिंगावण पेठ यात्रा मैदान पुराच्या पाण्याने वेढल्याने विविध व्यावसायिकांची रस्त्याकडेच्या टपऱ्या, पत्र्याचे शेड व खोकी सुमारे चार ते पाच फूट पाण्यात बुडाली तर काही पत्र्याची शेड पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. रिंगावन पेठ यात्रा मैदाननजीकच्या नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे वरकुटे-मलवडी, देवापूर, दिघंची, आटपाडी या भागातील वाहनांची वाहतूक ठप्प झाली.
 
येथील सातारा-पंढरपूर रस्त्यावरील माण नदीच्या पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, या पुलानजीकच्या रहिवाशी घरांस पुराच्या पाण्याने वेढा दिल्यामुळे त्यामधील रहिवाशी गुरुवार सकाळपर्यंत त्याच घरात अडकून राहिले होते. सकाळी पुराच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागताच संबंधित रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले.

जिल्ह्यात 268 रुग्ण वाढले; काेरेगाव, करंजे, साता-यात सर्वाधिक कोराेनाबाधित

पावसाने गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडीप दिल्यामुळे नागरिकांचा उंसत मिळाली व नदीच्या पुराच्या पाण्याची पातळीही कमी होत दुपारी एकच्या सुमारास रिंगावण पेठ यात्रा मैदान नजीकच्या पुलावरून वाहत असलेल्या पाण्याची पातळी कमी झाली. सायंकाळी चारनंतर या पुलावरून वाहतूक सुरू झाली. पावसामुळे शहरातील काही इमारतीमधील बेसमेंटच्या दुकानगाळे पाण्याने भरून गेले. त्यामुळे गाळेधारकांचे मोठे नुकसान झाले. या पावसामुळे शेतीसह पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, केळी, भुईमूग, उडीद, बाजरी यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने परतीचा पाऊस शेतीच्या मुळावर असल्याचे स्पष्ट झाले. 

शेतक-यांचा टाहाे; मायबाप सरकार काही काही राहिले नाही बघा

म्हसवड शहर व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले. परिणामी नागरिकांच्या चिंतेत भर पडली. मोबाईल डिस्चार्ज झाले व त्यापाठोपाठच मोबाईल टॉवरची रेंजही गायब झाल्यामुळे कोणाशी संपर्क साधणे आव्हानात्मक झाले. तब्बल 14 तासांनंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू झाला. माण नदी पुलानजीकच्या पात्रामधून गेलेल्या वीजवाहिनीच्या तारा तुटल्याचे निदर्शनास आले. त्यानजीकच्या शेतात पुराचे पाणी पसरल्यामुळे वीज मंडळाचा ट्रान्स्फॉर्मरही पाण्यात बुडाला.

माणला शेतकऱ्यांची धांदल; कांदा, बाजरीसह घेवड्याचे मोठे नुकसान

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power Supply Of Mhaswad Regulated After 14 Hours Satara News