सातारा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाळा होणार राष्ट्रीय स्मारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratapsinh high school will be national monument

सातारा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाळा होणार राष्ट्रीय स्मारक

सातारा - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या शहरातील श्रीमंत प्रतापसिंह हायस्कूलला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे. त्यामुळे साताऱ्यातील २०० वर्षांहून जुन्या असलेल्या ऐतिहासिक स्थळाचा देशपातळीवर गौरव होणार आहे. तसेच देशातील आणखी एक ऐतिहासिक स्थळाचा समावेश करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण घेतले, ती प्रतापसिंह शाळा सध्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारित पाचवी ते दहावी असून शाळेचा नावलौकिक वाढत आहे. प्रतापसिंह शाळेची स्थापना छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी केली. या शाळेची मूळ स्थापना १८२१ मध्‍ये झाली होती. परंतु, १८५१ मध्ये शाळेला मान्यता मिळाली. सद्य:स्थितीत शाळेला २०० वर्षे पूर्ण झाली आहेत. ही शाळा त्या काळापासून एकाच ठिकाणी राजवाड्यात भरते.

पूर्वी ही शाळा सातारा हायस्कूल म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर सातारा ॲग्रीकल्चर कॉलेज म्हणून तर शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर १९५१ मध्ये शाळेला छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल हे नाव देण्यात आले. तसेच ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत होते, त्यावेळी शाळेचे नाव सातारा एलिमेन्ट्री स्कूल असे होते.

प्रतापसिंह शाळेची नोंदवही अजूनही अभिमानाने जपून ठेवली आहे. यामध्ये विद्यार्थी म्हणून भीमराव रामजी आंबेडकर यांच्या मराठीतून केलेल्या स्वाक्षऱ्या आहेत. २३ सप्टेंबर १९१७ रोजी डॉ. आंबेडकरांनी जिथे अस्पृश्यता निर्मूलनाचा संकल्प केला होता, ते वडोदरा येथील ‘संकल्प भूमी वटवृक्ष’ परिसर स्थळ ही महत्त्वाची ठिकाणे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, अशी शिफारसही प्राधिकरणाने केली आहे. हे ठिकाण शंभर वर्षांहून अधिक जुने असून, डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या सामाजिक सन्मानाच्या क्रांतीचे ते साक्षीदार असल्याने ही मागणी केली आहे.

या शिफारशी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केंद्रीय संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासमोर सादर केल्या आहेत. सामाजिक समरसता आणि समतेच्या क्षेत्रातील हा एक अमूल्य वारसा आहे. राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन केले पाहिजे, असेही राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे अध्यक्ष तरुण विजय यांनी सांगितले.

‘प्रतापसिंह’चे गुणवंत माजी विद्यार्थी

श्रीमंत अण्णासाहेब भोसले, श्रीमंत शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंतप्रतिनिधी भगवानराव श्रीनिवासराव, डॉ. ए. एस. आळतेकर, डॉ. पी. बी. गजेंद्रगडकर, प्राचार्य आर. डी. करमरकर, आर. एन. दांडेकर, डी. एन. दाभोलकर, रँग्लर जी. एस. महाजनी, मेजर जनरल एच. एम. मोहिते, एम. व्ही. पटवर्धन, सर डी. बी. कूपर, रावबहादूर आर. आर. काळे, दादासाहेब करंदीकर, दिवाणबहाद्दूर के. आर. गोडबोले, व्ही. जी. चिरमुले, डी. एस. जोशी आदी थोर व्यक्तींनी शाळेत शिक्षण घेतले.

प्रतापसिंह शाळा ही ऐतिहासिक असून राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने दखल घेऊन राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी शिफारस केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेली ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी केंद्र सरकारनेही पावले उचलून शाळेचा नावलौकिक जगभर पोचवावा.

- सन्मती देशमाने, मुख्याध्यापक, प्रतापसिंह शाळा, सातारा.

Web Title: Pratapsinh High School Will Be National Monument

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..