esakal | लसीकरणात बाहेर गावच्या लोकांवर अन्याय; केंद्रात स्थानिकांचाच पगडा!
sakal

बोलून बातमी शोधा

Covid vaccination

लसीकरण केंद्रे असणाऱ्या गावांतील स्थानिक लोकांना प्राधान्यक्रमाने लस टोचून दिली जात असल्याचे प्रकार घडत आहेत.

लसीकरणात बाहेर गावच्या लोकांवर अन्याय

sakal_logo
By
फिरोज तांबोळी

गोंदवले (सातारा) : कोरोना निर्मूलनासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत (Vaccination campaign) लसीकरण केंद्रे (Covid Vaccination Center) असलेल्या गावांतील लोकांचा पगडा दिसून येत असल्याने बाहेरून येणाऱ्यांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे. माण तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे (Primary Health Center) व दोन ग्रामीण रुग्णालयांच्या (Rural Hospital) माध्यमातून कोविड लसीकरणाची (Covid vaccination) सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यांचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना दुसरा डोस दिला जात आहे. त्यासाठी लशींच्या उपलब्धतेनुसार लोकांना कळविण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक सकाळी लवकर या केंद्रांवर हजेरी लावतात. (Preference To Local Villagers In Covid Vaccination Campaign In Maan Taluka bam92)

मात्र, लसीकरण केंद्रे असणाऱ्या गावांतील स्थानिक लोकांना प्राधान्यक्रमाने लस टोचून दिली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. लस टोचून घेण्यासाठी केंद्रांतर्गत असणाऱ्या गावांतून येणाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप किरकसालचे उपसरपंच अमोल काटकर (Amol Katkar) यांनी केला आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांना लशीसाठी ताटकळत थांबावे लागत असून, स्थानिकांना मात्र तातडीने लस दिली जात आहे. त्यामुळे त्यादिवशी आलेल्या लशींचा कोटा संपल्याने उरलेल्या लोकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. कोरोनाचा प्रभाव अद्याप पूर्णपणे संपलेला नसताना लस टोचून घेण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना केंद्रांवर वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासनाने लसीकरणाबाबत योग्य नियोजन करून लोकांची गैरसोय टाळावी, अशी मागणीही श्री. काटकर यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा: साताऱ्याला मिळणार पूर्णवेळ आरोग्य अधिकारी?

ऑनलाइन बुकिंग करूनच लसीकरण केले जात असून, केंद्रावरही उपस्थितीनुसार टोकण नंबर दिले जात आहेत. उपलब्धतेनुसार सर्वांना लशीचा दुसरा डोस देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

-डॉ. लक्ष्मण कोडलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, माण

प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय ज्या गावात आहे, तेथील लोकांसाठी ५० टक्के व बाहेरून येणाऱ्यांसाठी ५० टक्के लशींचा साठा ठेऊन संबंधितांनी नियोजन करण्याची गरज आहे.

-अमोल काटकर, उपसरपंच, ग्रामपंचायत किरकसाल

Preference To Local Villagers In Covid Vaccination Campaign In Maan Taluka bam92

loading image