स्ट्रॉबेरीसह आता महाबळेश्वरची "केशर' ही लवकरच मिळणार

विकास जाधव
Thursday, 3 December 2020

महाबळेश्वरमधील केशर लागवडीसाठी काश्‍मीर येथील किरतवाड येथून कंद आणले आहेत. केशराचे हे कंद दोन हजार 400 रुपये किलोप्रमाणे मिळतात. एक किलोमध्ये 35 ते 40 कंद येतात. सध्या प्रायोगिक तत्त्वावर साडेतीनशे कंद मागविण्यात आले आहेत.

काशीळ (जि. सातारा) : महाबळेश्वर तालुक्‍याची आता स्ट्रॉबेरीबरोबर "केशर'साठी सुद्धा ओळख व्हावी, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. कृषी विभागाच्या वतीने राज्यातील केशर लागवडीचा पहिला प्रयोग महाबळेश्वर तालुक्‍यातील दोन गावांत राबविला जात असून, तो यशस्वी झाल्यास एक महत्त्वाचे पर्यायी पीक या भागातील शेतकऱ्यांनी उपलब्ध होईल.
 
देशभरात थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. थंड वातावरणामुळे येथे दर्जेदार स्ट्रॉबेरी घेतली जाते. केशरकरिताही थंड वातावरणाची आवश्‍यकता असते. यामुळेच महाबळेश्‍वर परिसरात कृषी विभागाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर केशरची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षेत्र महाबळेश्‍वर येथील गणेश जांभळे आणि मेटगुताड येथील दिलीप बावळेकर, अशोक बावळेकर या शेतकऱ्यांच्या शेतात केशरची लागवड करण्यात आली आहे. पावसामुळे लागवडीस उशीर झाला असला, तरी दोन महिन्यांपूर्वी येथे केशर लागवड करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच केशर लागवड करण्यात येत आहे. महाबळेश्वरची जशी स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. तशीच "काश्‍मिरी केशर'ची जगभरात उत्कृष्ट केशर म्हणून ओळख आहे. या केशरचा भाव सुमारे साडेतीन लाख रुपये किलो असा आहे. काश्‍मीरमध्ये पंपोरे आणि किरतवाड या भागांमध्ये या केशराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. केशराच्या लागवडीसाठी विशिष्ट प्रकारचे हवामान, जमीन, प्रदेश उंची लागते. या उत्पादनासाठी लागणारे क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून दोन ते अडीच हजार मीटर उंचीवरील असावे लागते. तेथील तापमान हे सरासरी दहा डिग्री सेल्सिअस असावे लागते. अशा ठिकाणी कंदाद्वारे एक फूट अंतरावर याची लागवड केली जाते.
 
केशरच्या लागवडीला महाबळेश्वर तालुक्‍यातील वातावरण व जमीन योग्य आहे. कृषी सहायक दीपक बोर्डे यांच्या प्रयत्नातून कृषी विभागाने काही शेतकऱ्यांच्या शेतात केशरची लागवड केली आहे. केशरची लागवड ऑगस्टनंतर केली जाते, तर मार्चमध्ये फुलांची काढणी केली जाते. नावीन्यपूर्ण बाब म्हणून महाबळेश्वर तालुक्‍यात केशरची लागवड केली आहे. महाबळेश्वर तालुका केशरसाठी ओळखला जावा आणि येथील शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळावे, तसेच शेतकऱ्यांना पर्यायी पीक म्हणून केशर लागवड केल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.
 
राज्याचा कृषी विभाग महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना येथील वातावरणाचा फायदा घेऊन नावीन्यपूर्ण शेती प्रयोग राबवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. येथील हवामान, जमीन हे केशरसाठी चांगले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येथील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीबरोबर उत्पन्नाचा आणखी एक चांगला स्रोत उपलब्ध होणार आहे. दरम्यान, गणेश जांभळे यांच्या शेतात लागवड केलेल्या केशरची कृषी सचिव एकनाथ डवले, उपविभागीय कृषी अधिकारी, गुरुदत्त काळे, गहू गेरवा संशोधन केंद्राचे शास्रज्ञ डॉ. दशरथ कदम यांनी पाहणी केली आहे. 

VIDEO : क्षेत्र महाबळेश्वरात काळा गहू; सातारा जिल्ह्यात प्रथमच कृषी विभागाचा प्रयत्न

काश्‍मीरमधून आणले कंद... 

महाबळेश्वरमधील केशर लागवडीसाठी काश्‍मीर येथील किरतवाड येथून कंद आणले आहेत. केशराचे हे कंद दोन हजार 400 रुपये किलोप्रमाणे मिळतात. एक किलोमध्ये 35 ते 40 कंद येतात. सध्या प्रायोगिक तत्त्वावर साडेतीनशे कंद मागविण्यात आले आहेत. 

""नावीन्यपूर्ण बाब म्हणून महाबळेश्वर तालुक्‍यात केशरची लागवड केली आहे. महाबळेश्वर तालुका केशरसाठी ओळखला जावा आणि येथील शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळावे, म्हणून केशर लागवड केली आहे. कृषी सहायक दीपक बोर्डे यांची धडपड त्यामागे आहे.'' 

- विजयकुमार राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Production Of Kashmiri Saffron Soon In Mahabaleshwar Trending News