फरारी संशयितांचा फलटण तालुक्यात पोलिसांवर गोळीबार, एकास पकडले; दोघे पळाले

किरण बाेळे
Tuesday, 1 December 2020

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गोळीबार होण्याचा प्रकार फलटण तालुक्‍यात पहिल्यांदाच घडला आहे. त्यामुळे या प्रकाराची गावागावांत दिवसभर चर्चा होत होती.

फलटण शहर (जि. सातारा) : एका गुन्ह्याप्रकरणी अटक करण्यास गेलेल्या संशयितांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याची घटना नुकतीच वडले (ता. फलटण) येथे घडली. वडले ते दुधेबाबी रस्त्यावर घडलेला गोळीबाराचा हा थरार संपूर्ण तालुक्‍यात चर्चेचा ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास जागेवर पकडले असून, दोघे जण फरारी झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुका हद्दीतील राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या वेशात गोळीबार करत सराफाचे दुकान लुटण्यात आले होते. बारामती तालुक्‍यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पळशी ते मोरगाव रस्त्यावर सराफ व्यावसायिकाची दुचाकी अडवत त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याकडील 11 लाख 66 हजारांचे दागिने अज्ञातांनी जबरीने चोरून नेले होते.
 
या गुन्ह्यातील संशयितांचा मोबाईल लोकेशनच्या आधारे सुगावा लागल्याने वडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे सहकाऱ्यांसमवेत वडले येथे आले होते. त्या ठिकाणी त्यांनी पाठलाग करून प्रवीण प्रल्हाद राऊत (रा. चिखली) याला ताब्यात घेतले; परंतु त्याच्यासमवेत असणारे अन्य संशयित पप्पू तथा सुहास सोनवलकर (रा. वडले, ता. फलटण) व प्रमोद तथा आप्पा ज्ञानदेव माने (रा. तामशेतवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी अटकेस विरोध केला. "तुम्हाला माहीत नाही का आम्ही कोण आहे ते, आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही,' असे धमकावत या दोघांनी सहायक पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर संशयित उसाच्या शेतात फरारी झाले. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. या संशयितांचा शोध पुणे ग्रामीण व फलटण पोलिस करीत आहेत.

कोयना धरणावरील महाकाय अजगराचा युवकांनी वाचविला जीव

दरम्यान, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गोळीबार होण्याचा प्रकार फलटण तालुक्‍यात पहिल्यांदाच घडला आहे. त्यामुळे या प्रकाराची गावागावांत दिवसभर चर्चा होत होती. वडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे हे फलटण शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सुदैवाने या गोळीबारात कोणासही कसलीही इजा झाली नाही.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Police Arrested One In Vadle Phaltan Satara News