अबब.. पाटणमध्ये आढळला साडेआठ फुटाचा भलामोठा अजगर

अरुण गुरव
Sunday, 20 September 2020

गेल्यावर्षी पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असलेल्या आब्रंग गावात भात कापणीच्या वेळी असाच अजगर शेतकऱ्यांना पाहण्यास मिळाला होता. यावर्षी याच विभागातील कुसरूंड गावाजवळ नुकताच अजगर पाहण्यास मिळाला असून तो पकडण्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोरगिरी (जि. सातारा) : कुसरूंड (ता. पाटण) येथील उसाच्या शेतात भांगलण करीत असलेल्या स्थानिक महिलांना आज (ता. 20) रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास भला मोठा अजगर दिसला. अजगर पाहताच त्यांच्यात घबराट पसरली. आजूबाजूचे लोक अजगर पाहण्यासाठी त्या ठिकाणी जमू लागले. परंतु, अजगर काही जागचे हाललेच नाही. दरम्यान, गावातील ग्रामस्थ आणि सर्पमित्र अक्षय हिरवे, विकास माने यांच्या मदतीने साडेआठ फुट उंचीचा सुस्त अजगराला पकडण्यात आले. तद्नंतर या अजगराला पोत्यामध्ये जेरबंद करून पाटण येथील वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे माहिती सर्प मित्रांनी दिली. 

याबाबत अधिक माहिती अशी, की कुसरूंड येथील मोरणा नदीच्या जवळ असलेल्या खडक ओढाच्या जवळील शिवारामध्ये उसाची शेती आहे. गावातील प्रगतीशील शेतकरी मधुकर शिंदे यांच्या उसाच्या शेतात भांगलणीचे काम सुरू होते. महिला भांगलण करीत असताना त्यांना उसाच्या सरीमध्ये सुस्त अवस्थेत पडलेले अजगर दिसले. त्यांनी शेतीचे मालक मधुकर शिंदे यांना सांगितले. त्यांनी याची माहिती पाटण येथील वनविभागास कळवली. तसेच गावातील तरुण युवकांनी सर्प मित्रांना फोन केला. तातडीने मोरगिरी येथील अक्षय हिरवे आणि कोयना विभागातील विकास माने या सर्प मित्रांनी येथे येऊन अजगरला पकडले. 

लेह-लडाख सीमेवर जवान सचिन जाधव यांना वीरमरण, दुसाळेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

त्यांना गावातील नितीन शिंदे, भरत पवार, नितीन सुतार, तानाजी शिंदे, सुरेश जाधव, तानाजी शिंदे, रामचंद्र सुतार यांनीही सहकार्य केले. अजगराला पोत्यामध्ये जेरबंद करून ते पाटण येथील वनविभागाच्या ताब्यात देणार असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. गेल्या वर्षी पाटण तालुक्यातील मोरणा विभागात असलेल्या आब्रंग गावात भात कापणीच्या वेळी असाच अजगर शेतकऱ्यांना पाहण्यास मिळाला होता. यावर्षी याच विभागातील कुसरूंड गावाजवळ नुकताच अजगर पाहण्यास मिळाला असून तो पकडण्यात आला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Python Found In Patan Satara News