अजगराच्या दहशतीने शेतकरी भयभीत; वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव

अरुण गुरव
Saturday, 17 October 2020

कुसरूंड येथे शेतमजुरी करणाऱ्या महिलांना अजगर दिसला. त्याला सर्पमित्रांनी जीवनदान देऊन नैसर्गिक आधिवासात सोडून दिल्याची घटना ताजी असतानाच इतर गावांतसुद्धा अजगरांचे दर्शन होत आहे. गेल्यावर्षी आब्रंग येथे भात काढणीच्या वेळी अजगर दिसला होता.

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील अनेक दुर्गम गावांत वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र असून, मोठी जंगले आहेत. या जंगलांत वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. येथील वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. वन्यप्राणी सैरभैर झाल्याने तालुक्‍यातील शेतकरी मात्र भयभीत झाले आहेत. 

तालुक्‍यातील जंगलांतून रस्ते तयार झाले. येथे खासगी कंपन्या उभ्या राहिल्या. तर अनेक ठिकाणी वनक्षेत्रात अतिक्रमण होण्याचे प्रकार वाढल्यामुळे अनेक वन्यप्राणी सैरभैर झाले असून, त्यांचा वावर नागरी वस्तीच्या परिसरात व्हायला लागला आहे. नजीकच कोयना आणि चांदोली असे विस्तीर्ण अभयारण्य आहे. त्याच ठिकाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प साकारला गेला आहे. याच अभयारण्यात फक्त वन्यप्राण्यांचा वावर पाहण्यास मिळत होता. राखीव आधिवास असल्याने लोकांना याबद्दल काहीही वाटत नव्हते. परंतु, सध्या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीत वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

परतीचा तडाखा! सातारा जिल्ह्यात दीड हजार हेक्‍टर पिकांचे नुकसान

कुसरूंड येथे शेतमजुरी करणाऱ्या महिलांना अजगर दिसला. त्याला सर्पमित्रांनी जीवनदान देऊन नैसर्गिक आधिवासात सोडून दिल्याची घटना ताजी असतानाच इतर गावांतसुद्धा अजगरांचे दर्शन होत आहे. गेल्यावर्षी आब्रंग येथे भात काढणीच्या वेळी अजगर दिसला होता. वन विभागाच्या मदतीने त्याला पकडण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी नेरळे येथे तर चक्क अजगराने शेळी गिळली होती. शेळीचा जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्याने केलेला संघर्ष अंगावर काटा उभा करणारा आहे. 

कऱ्हाड-पाटणात वरुणराजाचे रौद्ररुप, खरीप पिकांची मोठी हानी

अजगरांचा वावर शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा 

स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना या वन्यप्राण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. याला जबाबदार कोण, असा प्रश्न तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सरकार व वन विभागाने या संवेदनशील विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. सुगीच्या दिवसात भल्या मोठ्या अजगरांचा वावर शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pythons Are Rampant In Patan Taluka Satara News