...उदयनराजेंनी पवार साहेबांना केला फोन : राजेश टोपे

सिद्धार्थ लाटकर
Sunday, 9 August 2020

या दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात खूप काही बोलून गेली. परंतु त्यावर दस्तुरखूद्द आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी नेते पवारांच्या साक्षीने पडदा टाकला. 

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात आज (रविवार) ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्याची चर्चा जिल्हाभर पसरली. तसेच माजी मुख्यमंत्री आणि कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण हेही आले नाहीत. या दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात खूप काही बोलून गेली. परंतु त्यावर दस्तुरखूद्द आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी नेते पवारांच्या साक्षीने पडदा टाकला. 

आज (रविवार) सकाळच्या प्रहरी पवार हे कऱ्हाडत पोचले. शासकीय विश्रामगृहात त्यांची भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीच्या बहुतांश लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्यात राजेंचा वावर होता. त्याची चर्चा रंगली. त्यानंतर टाऊन हॉलमध्ये असलेल्या मुख्य बैठकीत नुकतेच राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण हे व्यासपीठावर कोठेच दिसले नाहीत. त्याची चर्चा समाजमाध्यमांतून राज्यभर उमटली.

राष्ट्रवादीच्या गोतावळ्यात भाजपाचे राजे; राजकारण्यांच्या भुवया उंचावल्या

आरोग्य मंत्री राजेश टोपेंना याबाबत पत्रकारांनी छेडले असता अंत्यत शांत आणि संयमी असे उत्तर टोपेंनी दिले. ते म्हणाले, मला आणि पवार साहेबांना त्यांचा फोन आला होता. त्यांच्या रुग्णालयातील रुटीन तपासणीसाठी ते जात असल्याचे सांगितले. त्यामुळे ते उपस्थित राहू शकलेले नाहीत. दूसरी काहीही गोष्ट नाही असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण हे दोघेही पवारांपासून सध्या दूर राहत असल्यानेच ते बैठकीस उपस्थित राहिले नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajesh Tope Clarifies About Udayanraje Bhosale Absence For Covid 19 Meeting Karad