उदयनराजेंच्या आदेशानंतरच साताऱ्यातील चौपाटीचे स्थलांतर

गिरीश चव्हाण
Friday, 27 November 2020

या जागेवर पूर्वी परळी, आसनगाव, तसेच कास भागांतून येणाऱ्या माल आणि प्रवासी वाहनांसाठीचा तळ करण्यात आला होता. या जागेवरच चौपाटी स्थलांतरित करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या असून, जागेच्या सपाटीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.

सातारा : येथील राजवाडा परिसरात भरणारी चौपाटी त्याच परिसरात असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्याजवळील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याच्या हालचाली सातारा नगरपालिकेने सुरू केल्या आहेत. त्याच अनुषंगाने त्या जागेत भराव घालून त्या ठिकाणचे सपाटीकरण करण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.
 
मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाउनपूर्वीच राजवाडा परिसरात असणारी चौपाटी बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन, तसेच सातारा पालिकेने दिले होते. त्यानुसार या ठिकाणचे खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे बंद करण्यात आले. तेव्हापासून गेली आठ महिने चौपाटीवरील व्यवसाय बंद आहे. लॉकडाउन शिथिल करण्याची प्रक्रिया केंद्र व राज्य शासनाने सुरू केल्यानंतर चौपाटी सुरू करण्याची परवानगी 105 व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, तसेच पालिकेकडे केली होती. मागणी करूनही चौपाटी सुरू करण्याबाबतचे आदेश जाहीर होत नसल्याने चौपाटीवरील व्यावसायिक अडचणीत आले होते. याबाबत त्यांनी सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. या पाठपुराव्यानंतर नगराध्यक्षा माधवी कदम व तत्कालीन उपाध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक किशोर शिंदे यांनी या मागणीची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांना दिली. त्यांनी चौपाटीसाठी पर्यायी जागा देता येईल का, याची चाचपणी करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार राजवाडा परिसरात असणाऱ्या पशुवैद्यकीय दवाखान्यालगतच्या मोकळ्या जागेचा पर्याय पुढे आला. या जागेवर पूर्वी परळी, आसनगाव, तसेच कास भागांतून येणाऱ्या माल आणि प्रवासी वाहनांसाठीचा तळ करण्यात आला होता. या जागेवरच चौपाटी स्थलांतरित करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या असून, जागेच्या सपाटीकरण नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. 

शेतकरी संघटनांची कार्यपद्धती देशी दारू दुकानांसारखी; रघुनाथदादांची शेट्टी, खाेतांवर टीका

चौपाटीबाबत लवकरच निर्णय : शिंदे 

राजवाड्यासमोर भरणारी चौपाटी स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असून, त्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यालगतच्या आठ गुंठे जागेचा पर्याय पालिकेने निवडला आहे. या जागेचे सपाटीकरण करण्यात आले असून, त्याठिकाणी किती गाडे बसतील आणि किती जागा प्रत्येक गाडीला द्यायची, याचा अभ्यास सध्या सुरू आहे. याबाबतचा अंतिम निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांच्या संमतीने लवकरच होईल, अशी माहिती माजी उपाध्यक्ष, विद्यमान नगरसेवक किशोर शिंदे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajwada Chowpatty Needs To Reopen Says Street Food Sellers To Udayanraje Bhosale Satara News