अंड्यांच्या व्यवसायातून विंगची नवी ओळख

यशोगाथा बचत गटाची : रखुमाई शेतकरी महिला बचत गटाने कुक्कुटपालनातून उत्पन्नाचा शोधला मार्ग
Rakhumai Farmers Women self Help Groups Poultry farming Success story
Rakhumai Farmers Women self Help Groups Poultry farming Success story

बचत गट चळवळीत शेतकरी महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या. त्यातील अनेकींनी शेतीपूरक व्यवसायास प्राधान्य दिले. खंडाळा तालुक्यातील विंग येथील रखुमाई शेतकरी महिला बचत गटातील सात महिलांनी कुक्कुटपालनातून स्वतःच्या संसाराला आकार दिला आहे. त्या सात जणींनी शेतकरी महिलांपुढे आदर्श ठेवला आहे. तो आदर्श घेऊन गावातील अनेक महिलांनी कुक्कुटपालनाला प्राधान्य दिल्याने आता विंगची ओळख अंड्यांचे गाव अशी झाली आहे.

खंडाळा तालुक्यातील विंग हे तीन हजार लोकसंख्येचे गाव. तेथील सर्व कुटुंबांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीसोबतच पशुपालन करण्याकडे गावातील शेतकऱ्यांचा कल. गाव परिसरात विविध कंपन्यांत गावातील तरुण वर्गाला रोजगार मिळत आहे. त्यामुळे शेती कामात महिलांचा मोठा सहभाग आहे. २०१७-१८ पासून विंग परिसरात ॲवॉर्ड संस्था गोदरेज अँड बॉईस मॅन्यु. कं. लि. यांच्या सामाजिक दायित्व उपक्रमातून कृषी विकास प्रकल्प राबविला आहे. त्याच्या माध्यमातून शेतकरी गट स्थापना, सेंद्रिय शेती, शेती व शेतीपूरक व्यवसाय उभारणीची कामे केली. त्याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे काम केले जाते.

विंग येथील पाण्याची टाकी परिसरातील महिलांनी अध्यक्षा अनिशा तळेकर, पोलिस पाटील व गट सचिव स्वप्नाली महांगरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन २०१९ मध्ये रखुमाई महिला शेतकरी गट स्थापन केला. आत्मा विभागाला हा गट महिला गट म्हणून नोंद केला. परिसरात अनेक परप्रांतीय लोक रोजगाराच्या निमित्ताने राहायला आहेत. त्यांची गरज ओळखून कुक्कुटपालन व्यवसायातून अंडी, मांस विक्रीचा व्यवसाय करण्यावर गटातील महिलांनी भर दिला. गटातील सात महिलांनी यात पुढाकार घेतला. यात स्वप्नाली महांगरे, सुषमा तळेकर, ज्योती भरगुडे, मंगल महांगरे, आशाताई महांगरे, बेबी महांगरे व वंदना कंक यांचा सहभाग आहे.

संस्थेच्या माध्यमातून या महिलांनी शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले. कुक्कुटपालनासाठी साडेचार लाख रुपये खर्च आला, त्यापैकी सहभागी महिलांनी दोन लाख रुपये स्वनिधी उभारला. गोदरेज कंपनीने त्यांना अडीच लाखांचे अर्थसाह्य केले. गेल्या तीन वर्षांपासून हा व्यवसाय उत्तमरित्या सुरू आहे. सहभागी महिला सामूहिक पद्धतीने याची संपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत.

पक्षी खरेदी-विक्री, खाद्य व्यवस्थापन, शेड स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, लसीकरण यामध्ये महिला तरबेज झाल्या आहेत. यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याने यांचा आदर्श घेऊन गावातील २० महिलांनीही परिसरातील कुकुटपालन कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केले आहे. त्यामुळे विंगची ओळख अंड्यांचं गाव म्हणून झाली आहे. गावात आणि परिसरातील बाजारपेठेत उत्पादित अंड्यांची विक्री केली जाते.

आम्ही शेतकरी महिला घरी किमान पाच-सहा कोंबड्या पाळत असतो. जास्त कोंबड्या पाळल्या, तर चांगले पैसे मिळतील, हा विचार केला. बचत गटाच्या माध्यमातून संधी मिळताच, कुक्कुटपालन व्यवसायच निवडला. त्यामुळे आता अंडी आणि कोंबड्यांच्या विक्रीतून कुटुंबाची आर्थिक उन्नती साधत आहोत.

- अनिशा तळेकर, अध्यक्षा, रखुमाई शेतकरी महिला बचत गट.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com