तुम्ही एकी ठेवा, बाकीचे मी बघतो; रामराजेंनी दिला नेत्यांना विश्वास

विशाल गुंजवटे
Saturday, 14 November 2020

आपल्या भागात आयटीआयची मुले कमी आहेत. यासाठी मुलांनी आयटीआयचे शिक्षण घेणे गरजेचे आहे असे रामराजे नाईक निंबाळकरांनी नमूद केले.

बिजवडी (जि. सातारा) : माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पक्ष, गटतट बाजूला ठेऊन एकत्र येत चांगली लढत दिली. तुम्ही सर्व जण एकत्र आलात; पण मला बोलवले नाही. मी आलो असतो, तर आज येथील चित्र वेगळेच असते. निदान आतातरी ही एकीची मोट निसटून देऊ नका. बाकीचे मी बघतो, असे सूचक वक्तव्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी केले.
 
बिजवडी (ता. माण) येथे सोनाई डेअरी संचलित शिवतेज मिल्क दूध संकलन केंद्राच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सोनाई डेअरीचे मुख्य कार्यकारी संचालक विष्णूकुमार माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले, अक्षयमहाराज भोसले, अमृत पोळ, महेंद्र अवघडे, पिंटूशेठ जगदाळे, विजय भोसले, विकास निंबाळकर आदी उपस्थित होते.

माणदेशी युवकांना हवीय राष्ट्रवादीत झोकून काम करण्याची संधी; मुलाखती सुरु
 
श्री. निंबाळकर म्हणाले, ""कोणतेही उद्योगधंदे, व्यवसाय करताना सरकारवर अवलंबून न राहता आपल्या हिमतीवर उभे करा. संदीप भोसले या युवकाने दुग्ध व्यवसाय उभा केला असून, त्यांना सर्व शेतकऱ्यांनी साथ द्यावी. आपल्या भागात एमआयडीसी, कारखाने उभारले जातायत; पण यात काम करणारी मुले ही सर्व बाहेरची आहेत. याचे प्रमुख कारण काय असेल तर आपल्या भागात आयटीआयची मुले कमी आहेत. यासाठी मुलांनी आयटीआयचे शिक्षण घेणे गरजेचे आहे.''
 
श्री. घार्गे म्हणाले, ""शिवतेज मिल्कच्या प्रारंभाच्या निमित्ताने निवडणुकीनंतर प्रथम एकत्र येण्याचा योग आला. आपली एकीची गाठ बांधली गेली आहे. फक्त विश्वासाच राजकारण करत दोन्ही तालुक्‍यांची बांधणी करायची आहे.'' या वेळी श्री. देसाई, एम. के. भोसेले, संजय भोसले, वीरकर आदींनी मनोगते व्यक्त केली.  अक्षयमहाराज भोसले यांनी सूत्रसंचालन केले. शिवतेज मिल्कचे व्यवस्थापक संदीप भोसले यांनी प्रास्ताविक केले. सहव्यवस्थापक विक्रम भोसले यांनी आभार मानले. 

गोरेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, देशमुख स्वगृही; माण-खटावातील राजकीय समीकरण बदलणार

माण, खटाव तालुक्‍यांवर लक्ष 

प्रभाकर घार्गे, अनिल देसाई यांनी रामराजे निंबाळकर यांना माण, खटाववर तुम्ही लक्ष द्यावे, असे म्हटले. त्यावर रामराजे म्हणाले, ""माझे या मतदारसंघावर चांगलेच लक्ष आहे. तुमची एकी अशीच ठेवा. बाकीचे मी बघतो. त्या दोघांना आणि तुमच्या उमेदवाराला दीपावलीच्या शुभेच्छा.'' 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramraje Naik Nimbalkar Praised Mann Taluka Leaders For Their Unity Satara News