कोरेगावात खंडणीखोर ४८ तासांत गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ransom seeker Arrested in 48 hours In Koregaon satara

कोरेगावात खंडणीखोर ४८ तासांत गजाआड

कोरेगाव - येथील एका सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यास चोरीच्या मोबाईलवरून एका अज्ञात गुंडाचे नाव घेऊन त्याच्या मुलास जिवे मारण्याची धमकी देत २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकास येथील पोलिसांनी केवळ ४८ तासांत गजाआड केले. त्यामुळे कोरेगाव पोलिसांचे पोलिस अधीक्षक अजय बन्सल, पोलिस उपअधीक्षक गणेश किंद्रे आदींनी अभिनंदन केले

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील एका सोन्या-चांदीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्यास त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत एक जण चोरीच्या वेगवेगळ्या मोबाईलवरून एका अज्ञात गुंडाचे नाव घेत २० लाख रुपयांची खंडणी मागत होता. त्यामुळे व्यापारी, त्याचे कुटुंबीय व मित्र परिवार भयभीत झालेला होता. शेवटी त्या व्यापाऱ्याने येथील पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गोपनीय पद्धतीने मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले.

सुरुवातीला मोबाईल कोल्हापुरातील असून, त्याचा वावर सातारा जिल्ह्यात असल्याचे आढळले. यादरम्यान खंडणीखोराने त्रिपुटी खिंडीत रक्कम घेऊन येण्यास सांगितले असता, त्यादरम्यान सुमारे १५ ते २० पोलिसांनी शेतकरी, वारकरी अशा वेशात सापळा रचला. मात्र, सापळ्याचा खंडणीखोराला संशय आल्याने तो आला नाही. त्यानंतर त्याने व्यापाऱ्यास पुन्हा मोबाईल करून ‘माझी शाळा करतो काय?’अशी विचारणा करत धमकावले आणि तो मोबाईल बंद ठेवला.

त्यामुळे संशयित शोधणे पुन्हा पोलिसांना आव्हानात्मक झाले होते. तरीही पोलिसांनी हार न मानता भुईंज व पुसेगाव परिसरातील असंख्य मोबाईल ‘ट्रेस’ करत करत त्यांचे विश्लेषण केले. खास बातमीदार नेमले. त्यातून अखेर संशयित खंडणीखोर येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरात जुनी रेल्वे लाइन परिसरात ओळख लपवून बसला असल्याचे निष्पन्न झाल्याने सहायक पोलिस निरीक्षक अर्चना शिंदे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने तेथे सापळा लावून पाठलाग करत खंडणीखोराला गजाआड केले.

त्याच्याकडे घातक हत्यारे, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल मिळून आले. त्याच्याकडून अधिक माहिती घेता त्याचे नाव राजेंद्र भगवान मोहिते (रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव) असे सांगितले. त्याने सहकाऱ्यांसह व्यापाऱ्यास मोबाईलवरून खंडणी मागितल्याचेही कबूल केले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास अर्चना शिंदे करत आहेत.

Web Title: Ransom Seeker Arrested In 48 Hours In Koregaon Satara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..