शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा, रासपचा आक्रमक पवित्रा

उमेश बांबरे
Tuesday, 20 October 2020

राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून सरसकट एकरी 50 हजारांची मदत जाहीर करावी, सोयाबीन, कापूस खरेदीसाठी सरकारी यंत्रणा उभी करावी, राज्यभरात फळबागांबरोबर कापसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना त्वरित मदत जाहीर करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने केली आहे.

सातारा : राज्यभरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आज (ता. २०) राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

याप्रसंगी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रकाश खरात, काशिनाथ शेवते, खंडेराव सरक, शैलेंद्र भोईटे, डॉ. रमाकांत साठे, दिनकर बरकडे, नितीन खरात, चंद्रकांत बरकडे, अशोक बरकडे आदी उपस्थित होते. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून सरसकट एकरी 50 हजारांची मदत जाहीर करावी, सोयाबीन, कापूस खरेदीसाठी सरकारी यंत्रणा उभी करावी, राज्यभरात फळबागांबरोबर कापसाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

फलटणमध्ये मुलांकडून वडिलांचा खून, दारुच्या नशेत प्रकार

याचबरोबर सुरुवातीला बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी करताना वापरलेली बी-बियाणे खराब लागल्याने सोयाबीन उगविलेले नव्हते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती. आता सोयाबीन शेवटच्या टप्प्यात आले असताना अचानक अवकाळी पावसाने नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला पुन्हा उभारी मिळण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashtriya Samaj Party Agitation In Front Of Satara District Collectors Office Satara News