साताऱ्यात घर, शेतजमिन घेताना वाचताहेत पैसे; कसे ते वाचा !

उमेश बांबरे
Wednesday, 9 September 2020

आता अनलॉकमध्ये हळूहळू व्यवहार सुरू होत आहेत. बंदच्या काळात नवे फ्लॅट, प्लॉट, जुन्या घरांच्या खरेदीचे व्यवहार थांबले होते. आता हे व्यवहार पूर्ववत व्हावेत, यासाठी शासनाने एक पाऊल पुढे येत दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात क्षेत्रनिहाय दीड ते तीन टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाउनमध्ये मुद्रांक नोंदणीवर परिणाम झाला होता. परिणामी शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यावर उपाय म्हणून आता शासनाने नवीन घर, जागा खरेदी, तसेच मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी असलेल्या मुद्रांक शुल्कात दीड ते तीन टक्‍क्‍यांपर्यंत कपात केली आहे. हा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत लागू राहील. ग्रामीण क्षेत्रात मात्र, मुद्रांक शुल्कात पूर्ण माफी देण्यात आली आहे. 2021 मध्ये मार्चअखेरपर्यंत आणखी अर्धा ते एक टक्के वाढीव कपात लागू आहे.
 
शासनाला सर्वाधिक महसूल मद्यविक्रीतून होतो, त्यापाठोपाठ दस्त नोंदणीसाठी लागणाऱ्या मुद्रांक शुल्कातून होतो. कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात शासनाने महसुलात कपात होऊ नये, यासाठी दस्तनोंदणी कार्यालये सुरू ठेवली होती, तरीही महसुलावर परिणाम झाला होता. एप्रिल, मे व जून महिन्यात महसुलात तब्बल दहा ते 20 कोटींने घट झाली होती. आता अनलॉकमध्ये हळूहळू व्यवहार सुरू होत आहेत. बंदच्या काळात नवे फ्लॅट, प्लॉट, जुन्या घरांच्या खरेदीचे व्यवहार थांबले होते. आता हे व्यवहार पूर्ववत व्हावेत, यासाठी शासनाने एक पाऊल पुढे येत दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्कात क्षेत्रनिहाय दीड ते तीन टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र नोंदणी महानिरीक्षक ओमप्रकाश देशमुख यांनी महसूल व मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

उदयनराजेंचंच श्रेय, शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कार्यकर्त्यांचा दावा!
 
उर्वरित महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे व मुंबई ग्रामीणसाठी प्रचलित पाच टक्के दरात दोन टक्के कपात करून डिसेंबरपर्यंत केवळ तीन टक्केच आकारला जाणार आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत साडेतीन टक्के आकारला जाईल. महापालिका व नगरपालिका क्षेत्र (एलबीटी) आणि जिल्हा परिषदेचा ग्रामीण भागासाठी (झेडपी) अभिहस्तांतरण, दान खत, फलोपभागी गहाण खतासाठी एक टक्का मुद्रांक शुल्क आकारले जात होते. त्याला डिसेंबरपर्यंत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यानंतर 31 मार्च 2021 पर्यंत केवळ अर्धा टक्के मुद्रांक शुल्क आकारला जाईल. बाजारमूल्य तक्‍त्यातील प्रभाव क्षेत्रातील गावांच्या (ग्रामीण) क्षेत्रासाठी सध्या पाच टक्के मुद्रांक शुल्क होते. त्याऐवजी आता डिसेंबरपर्यंत तीन टक्केच आकारले जाणार आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत साडेतीन टक्के आकारले जाणार आहे.

मनोरंजन विश्वाला आणखी एक झटका, तेलुगु टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या
 
जिल्हा परिषदेचा अधिभार असलेल्या ग्रामीण प्रभाव क्षेत्रासाठी सध्या एक टक्का मुद्रांक शुल्क आकारले जात होते. तेथे आता डिसेंबरपर्यंत कोणतेही मुद्रांक शुल्क आकारले जाणार नाही. पुढील वर्षी मार्चपर्यंत अर्धा टक्केच मुद्रांक शुल्क आकारले जाईल. ग्रामीण क्षेत्र वगळून होणाऱ्या व्यवहारांसाठी सध्या चार टक्के मुद्रांक शुल्क होते, ते डिसेंबरपर्यंत केवळ दोन टक्केच आकारले जाईल. पुढील वर्षी मार्चपर्यंत अडीच टक्केच आकारणी होईल. केवळ ग्रामीण भागासाठी सध्या एक टक्का मुद्रांक शुल्क होते, तेथे आता डिसेंबरपर्यंत कोणतेच शुल्क आकारले जाणार नाही. पुढील वर्षी मार्चपर्यंत अर्धा टक्का मुद्रांक शुल्क आकारले जाईल. 

बारा दिवसांत वाढले साताऱ्यात आठ हजार रुग्ण

शासनाने मुद्रांक शुल्कात कपात केली आहे. त्यामध्ये केवळ घर खरेदीसाठीच नव्हे तर शेतजमिनीच्या व्यवहारासह इतर बाबींचाही समावेश आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी तर पूर्णपणे माफी दिली आहे. त्यामुळे मालमत्ता खरेदी करताना होणारा खर्च वाचणार आहे. 
- मंगेश खामकर, सहजिल्हा निबंधक, मुद्रांक, दस्तनोंदणी कार्यालय, सातारा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reduction In Stamp Duty By Maharashtra State Government Satara News