चारुदत्त आफळेंना सातारा भूषण पुरस्कार जाहीर

उमेश बांबरे
Wednesday, 11 November 2020

यंदा पुरस्काराचे 29 वे वर्षे असून, यापूर्वी छोटा गंधर्व, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. शिवाजीराव भोसले, शाहीर साबळे, धावपटू ललिता बाबर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, लेखक प्रताप गंगावणे, रयत शिक्षण संस्था, बाबा महाराज सातारकर, क्विक हिलचे काटकर बंधू आदींना गौरविण्यात आले आहे.

सातारा : येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिक यांच्यातर्फे दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2020 साठी गेली 32 वर्षे आपल्या अमोघ वाणी व संगीताने समाजाला सुसंस्कारित करण्याचे कार्य करणारे प्रसिद्ध कीर्तनकार व अभिनेते चारुदत्त आफळे यांना जाहीर करण्यात आला आहे. तीस हजार रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ कर सल्लागार अरुण गोडबोले यांनी दिली.
 
क्षेत्रमाहुली (ता. सातारा) येथील राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे सुपुत्र आहेत. चारुदत्त यांनी वयाच्या पाचव्या वर्षी पहिले कीर्तन केले. पुढे दत्तदास बुवा घाग आदी ज्येष्ठांनी त्यांना मार्गदर्शन केले. गेल्या 32 वर्षांत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र, तसेच देशातही अनेक ठिकाणी आणि अमेरिका, इंग्लंड, दुबई, मॉरिशस या देशात तब्बल पाच हजारहून अधिक कीर्तने केली आहेत. याशिवाय संगीतावरही त्यांचे प्रभुत्व असून, शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व कुशल अभिनेते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत, तसेच टीव्ही चॅनेल्सवरही त्यांचे प्रबोधनपर कीर्तने लोकप्रिय झाली आहेत.

नरकासुराने ठेवली आठ महिने मंदिरे बंद; बंडातात्यांचा ठाकरेंवर घणाघात

बी. एपर्यंतचे औपचारिक शिक्षण पूर्ण करून ते मराठी संगीत रंगभूमीविषयक प्रबंधाचे संशोधन करीत आहेत. ते पीएचडीसाठी सादर होणार आहे. आतापर्यंत त्यांना पुणे महानगरपालिका, बालगंधर्व संगीत मंडळ, तसेच दीनानाथ मंगेशकर ट्रस्ट वगैरे संस्थांकडून विशेष पुरस्कारांनी गौरविलेले आहे. गोडबोले ट्रस्टतर्फे 1991 पासून प्रतिवर्षी ज्ञान-विज्ञान, उद्योग, कला, क्रीडा, समाजकार्य अशा कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याच्या सुपुत्राला सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते.

एका वेड्या माणसाची गाेष्ट...!

पुरस्काराचे 29 वे वर्षे असून, यापूर्वी छोटा गंधर्व, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. शिवाजीराव भोसले, शाहीर साबळे, धावपटू ललिता बाबर, डॉ. नरेंद्र दाभोलकर, लेखक प्रताप गंगावणे, रयत शिक्षण संस्था, बाबा महाराज सातारकर, क्विक हिलचे काटकर बंधू आदींना गौरविण्यात आले आहे. यावर्षी प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, ट्रस्टचे विश्वस्त अशोक, डॉ. अच्युत व उदयन, प्रदुमन, डॉ. चैतन्य गोडबोले यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे.

पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे : अरुण गोडबोले

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: R.N. Godbole Trust Declared Satara Bhushan Award To Charudatta Aphale Satara News