सातारा-पंढरपूर महामार्गालगतचा धोकादायक 'नेर फाटा' ठरतोय वाहतुकीस अडथळा

ऋषिकेश पवार
Tuesday, 10 November 2020

सातारा-पंढरपूर 548 सी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान महामार्गावरील रस्त्याची उंची कमी झाल्याने हा रस्ता महामार्गास ज्या ठिकाणी जोडला गेला आहे, त्या ठिकाणी तीव्र चढ-उतार झाला आहे. गतवर्षी या तीव्र चढ-उतारामुळे ट्रक, ट्रॅक्‍टर-ट्रॉली चालकांनी या रस्त्याने ऊस वाहतूक करण्यास मनाई केली होती.

विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍याच्या उत्तर भागातील शेतमाल वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला नेरखडवी ते ललगुण रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील नेर फाट्यानजीक असलेला तीव्र चढ-उतार तसेच कच्चा रस्ता यामुळे शेतमालाची अवजड वाहतूक करताना शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. 

सातारा-पंढरपूर 548 सी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान महामार्गावरील रस्त्याची उंची कमी झाल्याने हा रस्ता महामार्गास ज्या ठिकाणी जोडला गेला आहे, त्या ठिकाणी तीव्र चढ-उतार झाला आहे. गतवर्षी या तीव्र चढ-उतारामुळे ट्रक, ट्रॅक्‍टर-ट्रॉली चालकांनी या रस्त्याने ऊस वाहतूक करण्यास मनाई केली होती. यामुळे नेर, नागनाथवाडी, ललगुण, शिंदेवाडी, डिस्कळ, मोळ, या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. यंदा, या परिसरात मुबलक पाणी आणि बागायती जमिनीमुळे उसाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढले आहे. सध्या ऊसतोड सुरू झाली आहे. यंदाही या ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्याने या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. 

सावधान! सातारा-सज्जनगड मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दरम्यान, रस्त्यावरील तीव्र चढ-उतारासोबतच या ठिकाणच्या दुतर्फा असलेल्या टेकडीमुळे महामार्गावरील वेगाने ये-जा करणारी वाहने वाहनचालकांच्या निदर्शनास येत नाहीत. परिणामी, मोठी जीवितहानी होण्याचीदेखील शक्‍यता आहे. शिवाय पादचाऱ्यांनादेखील जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. तरी संबंधित विभागाने नागरिक तसेच शेतकऱ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. 

फलटणात रस्त्यासाठी सर्वपक्षीय रस्त्यावर; खासदार निंबाळकरांचा उपोषणाला पाठिंबा

काही ऊसतोड मजूर टोळ्या ट्रकमधून तर काही ट्रॅक्‍टर-ट्रॉलीतूनच उसाची वाहतूक करतात. परंतु, शिवारातील शेतमाल वाहतुकीचा मुख्य रस्ता खराब असल्याने ऊस वाहतुकीस अडचण होणार आहे. परिणामी, पिकास अफाट खर्च करूनही ऊसतोड वेळेत होण्याची शक्‍यता नसल्याने मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे. 
-सचिन पवार, शेतकरी, नेर 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Road Near Satara Pandharpur Highway Became Dangerous Satara News