
सातारा : आरटीई प्रवेशासाठी अल्प प्रतिसाद
सातारा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के प्रवेशासाठी निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची शेवटची मुदत आज संपली. परंतु, या प्रवेश प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देऊनही पहिल्या फेरीतील अद्याप ४२२ जागा शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात यंदा विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी २२७ शाळांची नोंदणी झाली असून एकूण तीन हजार २६१ विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आले आहेत. त्यामध्ये यंदा आरटीईअंतर्गत जिल्ह्यात एक हजार ९३१ जागा भरण्यात येणार असून त्यामधील पहिल्या राउंडमध्ये एक हजार ७०१ विद्यार्थ्यांची निवड यादी लावण्यात आली होती. त्यातील शेवटच्या दिवसापर्यंत एक हजार ७९ जागांवर प्रवेश निश्चित झाला आहे. अद्यापही पहिल्या फेरीत पूर्णत: प्रवेश झाला नसल्याचे दिसते.
दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत ता. ३० मार्चला काढण्यात आली. त्यानंतर चार एप्रिलला आरटीईच्या पोर्टलवर निवड व प्रतीक्षा यादी घोषित करण्यात आली. या विद्यार्थ्यांना २० एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यासंदर्भात मुदत देण्यात आली होती. मात्र, यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण संचालनालयाला प्रवेश घेण्यासाठी आणखीन मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसाठी २९ एप्रिल व पुन्हा १० मे पर्यंत मुदतवाढ दिली.
तरीही प्रवेश घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामध्ये पालकांच्या पसंतीच्या शाळेमध्ये प्रवेश जाहीर न झाल्याने प्रवेश घेण्याकडे पाठ फिरविली जात आहे. कागदपत्रांच्या अडचणींमुळे अनेक पालकांना प्रवेश घेताना अडथळे निर्माण होत आहेत. प्रवेश यादीत नाव येऊनही काही कारणांमुळे प्रवेश निश्चितीकडे पालकांनी पाठ फिरविल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
आरटीईअंतर्गत पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची उद्या शेवटची मुदत आहे. याबाबत तालुकानिहाय माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू असून आणखीन काही प्रवेश होण्याची शक्यता आहे.
- शबनम मुजावर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
Web Title: Rte Admission Update 422 Seats Remaining First Round School Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..