''सहकार चळवळ पाडण्याचे काम शरद पवार करत आहेत''

''सहकार चळवळ पाडण्याचे काम शरद पवार करत आहेत''

कोरेगाव (जि. सातारा) : यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली; परंतु ही सहकारी चळवळ पाडण्याचे काम शरद पवार करत आहेत, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. वीज बिल माफी, साखर कारखान्यांनी शंभर टक्के एकरकमी एफआरपी द्यावी, केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू करण्याची व या आंदोलनाची सुरवात सातारा जिल्ह्यातून येत्या २८ तारखेला एका सहकारी साखर कारखान्यावर मोर्चा काढून करण्याची घोषणा श्री. खोत यांनी केली. वीज, एफआरपीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर येत्या अधिवेशनात सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


जळगाव (ता. कोरेगाव) येथे झालेल्या रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, हणमंतराव जगदाळे, शंकर शिंदे, प्रकाश साबळे आदी प्रमुख उपस्थित होते. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचे समर्थन करून श्री. खोत म्हणाले, "शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव सांगण्याचा अधिकार ७० वर्षांनंतर पहिल्यांदाच मिळणार आहे. पण काही अपप्रचार करणारे लोक या क्षेत्रात अदाणी, अंबानी यांच्यासारखे भांडवलदार येतील, अशी भीती घालत आहेत. दुग्ध व्यवसाय खुला आहे म्हणून भांडवलदारांनी गोठे उभारले नाहीत. आडते, दलाल, मार्केट कमिटीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना पुढे करून कृषी कायद्यांविरूद्ध दिल्लीतील आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांचे खळे लुटण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा सुर्योदय असलेल्या कृषी विधेयकांच्या अंमलबजावणीसाठी आपण आंदोलन सुरू करत आहोत. कर, कर्जा नही देंगे, बिजली के बिल नही देंगे, असा आपला नारा आहे. त्यासाठी विज बिल माफीसाठीही आंदोलन छेडणार आहोत. वीज कापायला कोणी आले, तर हातात दांडके घेऊ."
 
पूर्वीच्या नेत्यांकडे दूरदृष्टी होती, असे नमूद करून श्री. खोत म्हणाले, "एक हजाराचा शेअर घेणारा सभासद साखर कारखान्याचा मालक असायचा. ही चळवळ यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा पाटील यांनी रुजवली. मात्र, त्यांचे नाव घेणारे शरद पवार ही चळवळ पाडण्याचे काम करत आहेत. सहकारातील कारखाना बंद पाडायचा आणि तोच विकत घ्यायचा, असे काम सुरू आहे. सभोवताली ऊस असलेला ३००-४०० कोटींचा कोरेगावचा कारखाना ५० कोटींमध्ये घेतला. आता कसा काय चालू लागला? साखर कारखानदारांनी ओळखले आहे, की शेतकऱ्यांमध्ये मेळ नाही. कारखान्यांमध्ये हजारो टन काटामारी केली जाते. एकरकमी एफआरपी द्यायला कोणी तयार नाही. त्यावर सहकार मंत्री देखील बोलत नाहीत. त्यांच्या सातारा जिल्ह्यातील कारखाने एफआरपी देत नसतील, तर नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. येत्या १५ दिवसांत शंभर टक्के एफआरपी न दिल्यास राज्यातील प्रत्येक कारखान्यावर मोर्चा काढून रयत क्रांती संघटना आंदोलन सुरू करणार आहे."  या आंदोलनाची सुरवात सातारा जिल्ह्यातून येत्या २८ तारखेला एका सहकारी साखर कारखान्यावर मोर्चा काढून करण्याचा आदेश श्री. खोत यांनी जिल्हा संघटनेला दिला. सचिन नलवडे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, विनायक पाटील, सचिन जाधव यांचीही भाषणे झाली.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com