
सुरक्षित केळघर घाटातील वाट बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बिकट
केळघर : वाहतुकीस अत्यंत सुरक्षित म्हणून ओळखला जाणाऱ्या केळघर घाटातील वाट बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बिकट झाली आहे. नागमोडी वळणे असलेल्या घाटात काही ठिकाणी संरक्षक कठडे व रेलिंग नसल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे.
हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल
सातारा व रायगड या जिल्ह्यांना जोडणारा रस्ता म्हणून केळघर घाटाला कोकणात जाणाऱ्या प्रवासी, वाहनचालकांची सर्वाधिक पसंती आहे. गेल्या वर्षी २२ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात रेंगडी येथे एकाच घरातील चार आणि वाटंबे येथील एकाचा पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. विटा ते महाबळेश्वर या राज्यमार्गाचे चारपदरीकरणाचे काम सध्या गतीने सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असून, या ठेकेदाराला रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेची थोडीशीही कदर नाही. बांधकाम विभागाने खरे तर या कामावर लक्ष ठेवणे आवश्यक असताना बांधकाम विभाग ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने या ठेकेदारावर कुणाचाही वचक नसल्याने मनमानी पध्दतीने रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
केळघर घाटात अवघड वळणांवर संरक्षक कठडे व रेलिंग नसल्यामुळे अपघातांची शक्यता जास्त आहे. घाटातील काम सुरू असताना ठेकेदाराने मोऱ्यांचे काम सदोष केलेले आहे. पाण्याचा निचरा पुरेसा न होईल अशा पद्धतीने मोऱ्या बांधल्या आहेत. रेंगडी दुर्घटनेदरम्यान मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे आले असताना घाटातील मोऱ्यांची उंची वाढवण्याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊनसुद्धा ठेकेदाराने या कामाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रस्त्याचे काम करताना राडा-रोडा रस्त्याच्या कडेला टाकल्याने मोठमोठे दगड शेतीत जाऊन शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. घाटात संरक्षक कठडे व रेलिंग बसवण्याचे काम पावसापूर्वी होणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात या घाटात अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
केळघर घाटात रस्ता रुंदीकरणाचे काम ठेकेदाराने निकृष्टपणे केले आहे. घाटात संरक्षक कठडे व रेलिंग नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. बांधकाम विभागाने योग्य त्या उपाययोजना पावसाळ्यापूर्वी कराव्यात.
-दत्तात्रय बेलोशे, सामाजिक कार्यकर्ते, केळघर
Web Title: Safe Kelghar Ghat In Bad Condition Negligenceof Construction Department
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..